Jug Jug Jiyo Movie Review: घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील जोडप्यांसाठी कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:35 PM2022-06-24T16:35:17+5:302022-06-24T16:41:18+5:30
Jug Jug Jiyo Movie Review: राज मेहता यांनी लग्न झालेल्या दोन जोडपी आणि नववधूच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेल्या कपल्सना हसत-खेळत सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला आहे.
कलाकार : अनिल कपूर, नीतू सिंह, वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल, टिस्का चोप्रा
दिग्दर्शक : राज मेहता
निर्माता : हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्वा मेहता
शैली : कॅामेडी फॅमिली ड्रामा
कालावधी : २ तास २८ मिनिटे
दर्जा : अडीच स्टा
चित्रपट परीक्षण- संजय घावरे
आज दिवसेंदिवस घटस्फोटांचं प्रमाण वाढतच आहे. लव्ह मॅरेजसोबतच अॅरेंज मॅरेज करणारी असंख्य जोडपी आज घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. आपसांतील तुटलेला सुसंवाद, करियरमधील स्पर्धा, विवाहबाह्य संबंध, चंचल मनोवृत्ती, जोडीदारावरील अविश्वास अशी विविध कारणंमुळं घटस्फोटासारखं नात्यावर शेवटचा घाव घालणारं पाऊल उचललं जात आहे. या चित्रपटात राज मेहता यांनी लग्न झालेल्या दोन जोडपी आणि नववधूच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेल्या कपल्सना हसत-खेळत सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला आहे.
पटियालामधील कुकू आणि नैना यांची ही कहाणी आहे. शालेय जीवनापासून एकमेकांवर प्रेम करणारे कुकू-नैना यांचं लव्ह मॅरेज होतं. त्यानंतर कथा पाच वर्षांनी पुढे सरकते. दोघेही कॅनडामध्ये असतात आणि त्यांच्या नात्यात दरी निर्माण झालेली असते. ती इतकी वाढलेली असते की दोघंही घटस्फोट घेण्याच्या निर्णयार्पंत पोहोचतात. अशातच दोघांनाही कुकूची बहिण गिन्नीच्या लग्नासाठी भारतात यावं लागतं. घटस्फोट घेण्याबाबत सर्वप्रथम आपल्या वडीलांना सांगून नंतर त्यांच्या मदतीनं मम्मीला सांगण्याची योजना कुकू आखतो, पण घडतं उलटंच. कुकूचे वडीलच त्याच्या आईला घटस्फोट देणार असल्याचं त्याला सांगतात. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाच्या विषयात नावीन्य नाही. वडील आणि मुलगा या दोघांचे संसार घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचा मुद्दा थोडा नवीन वाटला तरी विनोदाच्या आहारी गेल्यानं त्यातील गांभीर्य कमी झाल्यासारखं वाटतं.
रोमान्स आणि लव्ह स्टोरीमध्ये वेळ न घालवता एकाच गाण्यात लग्न आटोपतं घेतल्यानं सुरुवात वेगात होते. त्यानंतर थेट ५ वर्षांचा पुढचा काळ समोर येतो. त्यानंतर कथानक अपेक्षित वेगात पुढे सरकत रहातं. वडीलांचं अॅरेंज मॅरेज आणि मुलाचं लव्ह मॅरेज याद्वारे आज कोणत्याही प्रकारचा विवाह सुरक्षित नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. लग्न केलेल्या घरातील दोन जोडप्यांची वाताहत झाल्याचं पाहिल्यावर लग्नासाठी सज्ज असलेल्या मुलीची झालेली द्विधा मनस्थितीही यात पहायला मिळते. बोलीभाषा, पार्श्वसंगीत आणि इतर बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून उत्तम पंजाबी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रसंग आणि संवादांद्वारे चांगली विनोदनिर्मिती झाली आहे. काही विनोद मात्र दर्जाहीन वाटतात. एक गंभीर मुद्दा विनोदाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाले असले तरी यात आणखी काहीतरी वेगळं करता येऊ शकलं असतं असं सारखं वाटत रहातं. गीत-संगीताला पूर्णत: पंजाबी तडका देण्यात आला आहे. 'नाच पंजाबन...' हे गाणं अगोदरच हिट झालं आहे. इतर तांत्रिक बाबीही उत्तम आहेत.
अभिनय : वरुण धवन जरी मुख्य भूमिकेत असला तरी अनिल कपूरनंच जास्त भाव खाल्ला आहे. अभिनयापासून डान्सपर्यंत सर्वच बाबतीत वरुणननं आपलं कॅरेक्टर व्यवस्थित साकारलं असलं तरी वडीलांच्या भूमिकेत असूनही अनिल कपूरनंच बाजी मारली आहे. एक वेगळाच अनिल यात पहायला मिळतो. कियारा अडवाणी आणि वरुण यांची जोडी पडद्यावर छान वाटते. कियारानं नैनाच्या कॅरेक्टरमधील विविध पैलू बारकाईनं सादर केले आहेत. नीतू कपूर यांनी आपल्या प्रतिभेला साजेशी भूमिका साकारली आहे. मनीष पॅालनं साकारलेलं सहाय्यक भूमिकेतील कॅरेक्टरही लक्षात राहण्याजोगं आहे.
सकारात्मक बाजू : कोर्टाची पायरी चढलेल्या जोडप्यांसाठी हा चित्रपट घटस्फोटाच्या निर्णयापासून परावृत्त करत पुनर्विचार करण्याचा कानमंत्र देणारा ठरू शकतो.
नकारात्मक बाज : यापूर्वी बऱ्याच चित्रपटांमध्ये आलेला विषय जुनाच असल्यानं पुढे काय घडू शकतं याचा अंदाज अगोदरच लावणं शक्य होतं.
थोडक्यात : एक गंभीर विषय हसत-खेळत मांडण्यात आला आहे. गीत-संगीत, अभिनय आणि इतर तांत्रिक बाबी मनोरंजनासाठी पोषक असल्यानं एकदा पहायला हरकत नाही.