ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

By Admin | Published: May 15, 2017 08:42 PM2017-05-15T20:42:24+5:302017-05-15T21:02:26+5:30

गेली सत्तर वर्षांहून अधिक वर्षे नाट्यव्यवसायात रंगभूषेची धुरा समर्थपणे सांभाळणारे रंगभूषाकार कृष्णा बोरकर

Veteran actor Krishna Borkar passed away | ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.15 -  जेष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे आज दिर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते.  गेली सत्तर वर्षांहून अधिक वर्षे नाट्यव्यवसायात रंगभूषेची धुरा समर्थपणे सांभाळणारे रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे  आज संध्याकाळी मूत्रपिंडाच्या विकाराने मुंबईत निधन झाले.  वयाच्या अकराव्या वर्षांपासून ‘रंगभूषाकार’ म्हणून बोरकर यांचा प्रवास सुरू झाला. वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करल्यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या अभ्यासक्रमात ‘रंगभूषा’ हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवण्याचं काम ते करत. बोरकर कुटुंबीय खरे तर गोव्यातील बोरी गावचे. पण पोर्तुगीजांच्या काळात काही मंडळींनी तिथून स्थलांतर केले आणि बोरकर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिंचखरी गावी आले.

वडिलांचे निधन झाल्याने आई त्यांना व त्यांच्या बहिणीला घेऊन इ.स. १९३८च्या सुमारास मुंबईत आली. काही दिवसांसाठी कृष्णा बोरकर यांना त्यांचे ज्योतिषी असलेले चुलतकाका यांचेकडे रहावे लागले. नंतर मात्र, ते आईसह मुंबईत सिद्धिविनायक मंदिराजवळच्या कलकत्तावाला चाळीत राहू लागले. नाटकाचे पडदे रंगवण्याचे काम करणारे पांडुरंग हुले कलकत्तावाला चाळीच्या जवळच रहात असत. त्यांचे काम बोरकर न्याहाळीत असत. एकदा पांडुरंग हुले यांनी कृष्णा बोरकरांना दामोदर हॉलमधे एका नाटकाला नेले. त्या नाटकासाठी हुले सांगतील ते काम कृष्णाने केले आणि त्याबद्दल त्यांना आठ आणे मिळाले. हुलेंबरोबर असेच काम करीत असताना कृष्णा बोरकर यांना पात्रांच्या रंगभूषांमध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांनी कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या "सूडाची प्रतिज्ञा’" या नाटकासाठी पहिल्यांदा स्वतंत्रपणे रंगभूषा केली. त्यावेळी त्यांचे वय फक्त 11 होते. त्या अनुभवावर कृष्णा बोरकर यांना केव्हाकेव्हा रंगभूषाकाराची कामे मिळू लागली.पुढे काही वर्षे कृष्णा बोरकर हे भुलेश्वर येथील विविध प्रकारचे ड्रेस भाड्याने देणार्‍या एका दुकानदाराकडे काम करत होते. या प्रकारचे दुकान चालवणारे ते एकमेव मराठी दुकानदार होते. तेथे त्यांना महाराष्ट्र नाटक कंपनीचे रंगभूषाकार कमलाकर टिपणीस भेटले. त्यांच्या शिफारशीमुळे कृष्णा बोरकर यांना चित्रपटातील नटांना रंगवण्याचे काम मिळाले. राजकमल चित्रपटसंस्थेचे रंगभूषाकार बाबा वर्दम एकदा कामावर आलेले नसताना कृष्णा बोरकर यांना अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा करायला मिळाली आणि ती पाहून व्ही. शांताराम यांनी स्वतःची रंगभूषाही त्यांच्याकडून करून घेतली.

बोरकर यांची रंगभूषा असलेली नाटके आणि चित्रपट-
गगनभेदी
गरुडझेप
गारंबीचा बापू
गुडबाय डॉक्टर
दीपस्तंभ
दो आँखे बारा हाथ (चित्रपट)
नवरंग (चित्रपट)
पृथ्वी गोल आहे
मौसी (चित्रपट)
रमले मी
रणांगण : या नाटकातील १७ कलावंतांना ६५ प्रकारच्या रंगभूषा कराव्या लागल्या.
शिवसंभव
सूडाची प्रतिज्ञा
स्वामी
हे बंध रेशमाचे


बोरकर यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलेल्या नाट्यसंस्था आणि चित्रसंस्था-
चंद्रलेखा
नाट्यसंपदा
रंगशारदा
श्री रंगशारदा
राजकमल चित्रसंस्था


कृष्णा बोरकर यांनी रंगभूषा केलेले प्रसिद्ध कलावंत-
डॉ. काशीनाथ घाणेकर
केशवराव दाते
मास्टर दत्ताराम
नानासाहेब फाटक
बाबूराव पेंढारकर
मधुकर तोरडमल
यशवंत दत्त
वसंत शिंदे
व्ही. शांताराम
सुधीर दळवी
पुरस्कार-
१९९२च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक, गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुकर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिले. 

(सविस्तर वृत्त लवकरच)

 

Web Title: Veteran actor Krishna Borkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.