‘डिंपल गर्ल’ला भेटले, बोलले, पण...! संजय खान यांनी मागितली प्रीती झिंटाची जाहीर माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:13 PM2021-11-23T14:13:43+5:302021-11-23T14:14:11+5:30
Preity Zinta : प्रीती झिंटाच्या गालावरच्या डिंपलवर अख्ख जग फिदा आहे. या डिंपल गर्लला कोण ओळखत नाही? अर्थात अपवाद संजय खान यांचा.
चुलबुली, हसरी प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) गालावरच्या डिंपलवर अख्ख जग फिदा आहे. या डिंपल गर्लला कोण ओळखत नाही? अर्थात अपवाद संजय खान ( Sanjay Khan) यांचा. होय, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक संजय खान प्रीतीला भेटले, तिच्याची बोलले, पण तिला ओळखू शकले नाहीत. मग काय, त्यांनी यासाठी मोठ्या मनाने प्रीतीची जाहीर माफी मागितली.
अलीकडे संजय खान मुलगी सिमोनसोबत दुबईला जात होते. त्याच विमानात प्रीती झिंटाही प्रवास करत होती. सिमोनने प्रीतीची ओळख करून दिली, पण संजय खान यांना तिचं नाव काही केल्या आठवलं नाही. आपण तिला चित्रपटांमध्ये पाहिलं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं पण, ही नेमकी कोण? हे काही त्यांना आठवेना. याबद्दल संजय खान यांनी ट्विट करत प्रीतीची जाहीर माफी मागितली आहे.
Dear Preity- as a gentleman I thought its my duty to apologise tht I couldn't recognize you when my daughter Simone introduced you on a flight to dubai. Only if Zinta was uttered I would have remembered you as I have seen many of ur films with ur beautiful face.@realpreityzinta
— Sanjay khan (@sanjaykhan01) November 22, 2021
‘प्रिय प्रीती, एक सज्जन व्यक्ती म्हणून तुझी माफी मागणं हे माझं कर्तव्य आहे. दुबईच्या फ्लाइटमध्ये माझ्या मुलीने तुझी ओळख करून दिली तेव्हा मी तुला ओळखू शकलो नाही. झिंटा हे आडनाव ऐकल्यावर मला कदाचित आठवलं असतं. कारण तुझा सुंदर चेहरा मी अनेक चित्रपटांमध्ये पाहिला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी प्रीतीला माफी मागितली. प्रीतीने अद्याप संजय खान यांच्या या ट्विटवर उत्तर दिलेलं नाही. ती काय उत्तर देते ते बघूच.
प्रीती नुकतीच आई बनली. सरोगसीच्या माध्यमातून तिने जुळ्यांना जन्म दिला. जय आणि जिया असं या बाळांचं नामकरण करण्यात आलंय.
प्रीती सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. 2016 तिने जेन गुडइनफ याच्याशी लॉस एंजिलिसमध्ये हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलं आणि लग्नानंतर प्रीती अमेरिकेला स्थायिक झाली. प्रीतीने 1998 मध्ये मणी रत्नम दिग्दर्शित दिल से या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. कल हो ना हो, वीर झारा, कभी अलविदा ना कहना, क्या कहना, संघर्ष, दिल चाहता है यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत.