"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 04:41 PM2024-11-14T16:41:21+5:302024-11-14T16:42:44+5:30
सविता मालपेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं रोखठोक मत शेअर केलंय
'..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा २०१८ साली आलेला सिनेमा. या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. सुबोध भावेने डॉ.काशीनाथ घाणेकर यांची प्रमुख भूमिका साकारली. अभिजीत देशपांडे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात रंगभूमी गाजवणाऱ्या डॉ.काशीनाथ घाणेकर यांंचं आयुष्य दाखवण्यात आलं. याच सिनेमाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी त्यांची नाराजी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दर्शवली.
सविता मालपेकर म्हणाल्या की, "डॉ. काशीनाथ घाणेकर सिनेमा आला. आज आशालता वाबगावकर इथे नाहीये. आशालताने डॉक्टरांबरोबर खूप काम केलं. जवळजवळ १५०० प्रयोग आशालताताईंनी त्यांच्याबरोबर केले असतील. आशालताताई रडली माझ्याकडे येऊन आणि म्हणाली सविता आपण हा सिनेमा बघायचा नाहीय. तू गेलीस तर बघ सिनेमाला. मी त्यांना काय झालं विचारलं. तर त्या म्हणाल्या नाही जायचं. डॉक्टर असे होते?"
सविता मालपेकर पुढे म्हणाल्या, "जे डॉक्टरांबद्दल सिनेमात पहिलंच वाक्य बोललंय ते अत्यंत चुकीचं आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर ही रंगभूमीला लागलेली कीड आहे, असं वाक्य आहे सिनेमात. मला हा सिनेमा बघायचा नव्हता. पण मी एका ठिकाणी परीक्षक होते आणि मला हा सिनेमा बघायला लागला. त्यावेळी अभिजीत देशपांडे तिथे आले होते. मी त्यांना म्हणाले, हे नाही मला आवडलं, फार चुकीचं दाखवलं तुम्ही."
सविता मालपेकर शेवटी म्हणतात, "पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला सुद्धा कोणीही रस्त्यावर बसून दारु प्यायचे नाहीत. डॉक्टर शौकीन होते. पण ते त्यांच्या ऑरामध्ये राहायचे. ते रस्त्यावर कधीच दारु प्यायले नाहीत. म्हणजे मी डॉक्टरांना ओळखत होते, काम केलं मी त्यांच्यासोबत. तर मला नाही तो कधी अनुभव आला की त्यांनी चिमटा काढलाय." अशाप्रकारे सविता मालपेकर यांनी रोखठोक मत मांडलंय.