ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे निधन; १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 05:46 AM2024-07-04T05:46:10+5:302024-07-04T05:47:09+5:30
२८ ठिकाणे बदलणाऱ्या स्मृती बिस्वास काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या होत्या.
मनोज मालपाणी
नाशिक - हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास - नारंग यांनी बुधवारी (दि.३) रात्री नऊ वाजता नाशिकरोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या १०० वर्षांच्या होत्या. गुरूवारी (दि.४) सकाळी १० वाजता ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘नेक दिल’, ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’ असे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत स्मृती बिस्वास यांनी १९३० ते १९६० अशी तीन दशके बॉलिवूडसह बंगाली चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजविले. कधीकाळी कोट्यवधी रूपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती नाशिक येथे एका छोट्याशा घरात वास्तव्य करत होत्या. २८ ठिकाणे बदलणाऱ्या स्मृती बिस्वास काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या होत्या.
राज कपूर, किशोरकुमार, भगवानदादा, नर्गिस, बलराज साहनी यांसारख्या अभिनेत्यांसोबत स्मृती बिस्वास यांनी जवळपास ९० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना भावल्याने अनेक पुुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले. त्यांना ‘दादासाहेब फाळके गोल्डन ईरा’ या मानाच्या पुरस्काराने देखीलही सन्मानित करण्यात आले होते. मात्र दादासाहेबांच्या भूमित त्यांच्यावर अखेरच्या काळात एकांतवासात राहण्याची वेळ आली होती.
पती प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक
स्मृती बिस्वास-नारंग यांचे पती डॉ. एस. डी. नारंग ऊर्फ राजा हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता तथा दिग्दर्शक होते. २५ जानेवारी १९८६ रोजी त्यांचे मधुमेहाने निधन झाले. ते एका प्रसिद्ध स्टुडिओचे मालक होते. पतीच्या निधनानंतरच स्मृती बिस्वास यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला.
देवानंद यांचा लग्नाचा प्रस्ताव
सदाबहार अभिनेते देवानंद यांनी स्मृती बिस्वास यांच्यासमोर १९४० मध्ये लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव नाकारात डॉ. एस. डी. नारंग यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत न राहता संसारात रममाण होणे अधिक पसंत केले.