विकी आणि शिवरायांचा 'छावा' आमनेसामने! हिंदी-मराठी सिनेसृष्टीला छत्रपती संभाजी महाराजांची मोहिनी
By संजय घावरे | Published: December 23, 2023 11:35 PM2023-12-23T23:35:11+5:302023-12-23T23:36:25+5:30
विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेत प्रथमच संभाजी महाराजांवर सिनेमे बनत आहेत.
मुंबई - धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले या व्यक्तिमत्त्वाने सध्या मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीला मोहिनी घातली आहे. आजवर मालिकेद्वारे घरोघरी पोहोचलेले शंभूराजे लवकरच रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. एकीकडे विकी कौशल संभाजीराजांच्या रूपात हिंदी चित्रपटाद्वारे जगभर पोहोचणार आहे, तर दुसरीकडे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या नजरेतून शंभूराजे मराठी रसिकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेत प्रथमच संभाजी महाराजांवर सिनेमे बनत आहेत.
अभिनेता विकी कौशलसाठी यंदाचे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटापासून यंदा विकीची सुरुवात झाली. काही दिवसांपासून रिलीज झालेल्या 'सॅम बहादूर'मध्ये त्याने साकारलेल्या शीर्षक भूमिकेचे खूप कौतुक झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून तो 'छावा' या आगामी हिंदी चित्रपटात संभाजीराजांची व्यक्तिरेखा साकारत असल्याने चर्चेत आहे. यासाठी त्याने दाढीही वाढवली असून, विविध प्रकारचे प्रशिक्षणही घेतले आहे. 'छावा'चे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर करत आहे. सध्या शूट सुरू असलेला विकीचा 'छावा' पुढल्या वर्षी प्रदर्शित करण्याची योजना आहे. या चित्रपटात विकीसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'छावा' चित्रटाच्या निमित्ताने 'जरा हटके जरा बचके'नंतर विकी आणि लक्ष्मण पुन्हा एकत्र आले आहेत.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने 'शिवराज अष्टक' संकल्पनेअंतर्गत बनवलेले 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज', 'सुभेदार' या सिनेमांना तिकीटबारीवर यश मिळाल्यानंतर आता त्याच्या सहाव्या सिनेमाची प्रेक्षंकांना प्रतीक्षा आहे. याच वेळेस दिग्पालने संभाजी महाराजांवर सिनेमा बनवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'शिवरायांचा छावा' असे आहे. वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार हे रहस्य लवकरच उलगडणार आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग भोर परिसरात झाले आहे. यात लढायांपासून इतर बरेच प्रसंग चित्रीत करण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन दिग्पालने केले आहे.
विकीचा 'छावा' आणि 'शिवरायांचा छावा' हे दोन्ही सिनेमे एकाच वेळी बनत असल्याने दोघांमध्ये किती साम्य आणि किती वेगळेपण असेल याची उत्सुकता आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक मराठमोळे असून दोघांनीही निश्चितच शंभूराजांच्या चरीत्राचा अभ्यास केलेला आहे. दिग्पालने आजवर पाच शिवकालीन चित्रपट बनवल्याने त्याच्या गाठीशी ऐतिहासिक चित्रपट बनवण्याच्या अनुभवाची शिदोरी आहे, पण लक्ष्मण उतेकरचा मात्र हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. असे असले तरी दिग्पाल आणि लक्ष्मण या दोघांकडे विषय उत्तमपणे सादर करण्याची हातोटी असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये तुलना नक्कीच होईल असे चित्रपट जाणकारांचे म्हणणे आहे.