उधम सिंग या चित्रपटात इरफान खान ऐवजी हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:01 PM2019-03-04T13:01:31+5:302019-03-04T16:15:33+5:30
इरफान खानच्या उधम सिंग या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.
इरफान खानची तब्येत आता सुधारत असून तो लवकरच हिंदी मीडियम २ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. इरफान खानच्या उधम सिंग या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. आता हा चित्रपट विकी कौशल करणार असून विकीने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे एक चांगलेच स्थान निर्माण केले आहे.
राजी आणि संजू या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुकत आहेत. दिग्दर्शक शूरजित सरकारच्या उधम सिंगमध्ये आता विकी झळकणार असून या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला उधम सिंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेत विकीची निवड करण्याविषयी शूरजित सांगतो, विकीच्या आजवरच्या कारकिर्दीकडे तुम्ही पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. या भूमिकेसाठी पूर्णपणे झोकून देईल असा कलाकार मला या चित्रपटासाठी हवा होता आणि त्यात या चित्रपटात एका पंजाबी मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे आणि विकी हा पंजाबी आहे. याच कारणांमुळे मी या भूमिकेसाठी विकीला घेण्याचे ठरवले.
शूरजित सरकारसोबत काम करायला मिळत असल्याने विकी सध्या चांगलाच खूश आहे. तो सांगतो, शूरजित यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. त्यांचे चित्रपट, त्यांचे काम याच्या मी अनेक वर्षांपासून प्रेमात आहे. त्यामुळे शूरजीत यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणे हे माझ्यासाठी खूप खास आहे.
CONFIRMED... Vicky Kaushal in Shoojit Sircar’s next film, titled #UdhamSingh... Story of a freedom fighter... Set in the pre-Independence era... Produced by Ronnie Lahiri... Starts next month... 2020 release. pic.twitter.com/hxTTajlRYP
— taran adarsh (@taran_adarsh) March 4, 2019