विकी कौशल का देतोय Haunted ठिकाणांना भेटी, जाणून घ्या यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 06:30 AM2020-02-22T06:30:00+5:302020-02-22T06:30:02+5:30
विकीने गेल्या काही दिवसांत अनेक Haunted ठिकाणांना भेट दिली आहे.
विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटात त्याच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून सध्या याच ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने विविध फंडे वापरले आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विकी सध्या देशभरातील विविध भयावह ठिकाणांना भेटी देत आहे. विकी आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक भानू प्रताप सिंह काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील भूली भटियारी का महल येथे गेले होते. या महलमध्ये भूत असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. तसेच विकीने नुकतीच हैद्राबादला जाऊन अशाच एका ठिकाणाला भेट दिली आणि हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच कोलकाता येथील भूतर बारी येथे देखील तो जाऊन आला. या सगळ्या भयावह ठिकाणांना भेटी दिल्यानंतर आता विकीने त्याच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, तुमच्या परिसरातील एखादी भयावह जागा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगा... मी नक्कीच त्या ठिकाणाला भेट देईन...
भूतः द हाँटेड शीपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळाले होते. हा ट्रेलर थरकाप उडवणारा असून या ट्रेलरमध्ये आपल्याला विकी कौशल, आशुतोष राणा, भूमी पेडणेकर यांना पाहायला मिळाले होते.
भूतः द हाँटेड शीप या ट्रेलरमध्ये आपल्याला एक भलेमोठे जहाज दिसत असून हे जहाज अचानक समुद्रकिनारी मिळाले आहे. या जहाजात काय आहे हे पाहाण्यासाठी एक ऑफिसवर (विकी कौशल) त्याच्या आत जातो. पण त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या, भूतं आपल्याला फिरताना दिसतात. या ट्रेलरमध्ये एक बाई आणि मुलगी दिसत असून हे कोण आहेत असा प्रश्न नक्कीच पडतो. हा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.
भूतः द हाँटेड शीप या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले असून धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूत हा धर्मा प्रोडक्शन आणि विकी कौशलचा पहिला हॉरर चित्रपट असून हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.