VIDEO : आयुष्य सेलिब्रेट करायला शिकवणारा "हृदयांतर"
By Admin | Published: May 31, 2017 12:06 PM2017-05-31T12:06:46+5:302017-05-31T12:26:38+5:30
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याचा पहिला मराठी दिग्दर्शित सिनेमा "हृदयांतर" सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित पहिला मराठी सिनेमा "हृदयांतर" सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा ""क्रिश"" हृतिक रोशन यानिमित्तानं प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे. यात हृतिक पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहे. 7 जुलै रोजी हा सिने बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
"हृदयांतर" सिनेमाच्या ट्रेलरमधील एक-एक संवाद मनाला भिडणारे आहेत. शेखर जोशी आणि समिरा जोशी यांच्या अरेंज्ड मॅरिजची ही कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कुटुंब, भांडणं, वाद, दुरावा, जगण्यातील परीक्षा, आयुष्यात आलेलं भयानक वळण आणि यातून दुरावलेली मनं पुन्हा एकत्र येणे, अशीच काहीशी या सिनेमाची कहाणी ट्रेलरमध्ये दिसत आहे. मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे या दोघांची सिनेमामध्ये मुख्य भूमिका आहे.
ट्रेलरमधील मुक्ता बर्वेचे संवाद ""आपण तोपर्यंत कणखर होत नाही जोपर्यंत आपल्याकडे कणखर होण्याशिवाय दुसराच पर्याय नसतो. दोन माणसांना कधी कधी दूर व्हावं लागतं पुन्हा स्वतःला शोधण्यासाठी... "हृदयांतर" होण्यासाठी... आयुष्य सेलिब्रिट करण्यासाठी...
सतत आनंदी राहणं शक्य नाही पण आनंदाची किंमत कळायला हवी असेल तर थोडं दुखावलं जाणं गरजेचं आहे"", मनाला स्पर्शून जाणारे आहेत. मनाला भिडणारे संवाद आणि सिनेमातील नेमका विषय काय असणार आहे?, याची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.
शेखर (सुबोध) आणि समिरा (मुक्ता) यांच्या वैवाहिक आयुष्यातील आनंद हरवलेला असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे . दोघंही एकमेकांच्या स्वभावासोबत सतत तडजोड करून राहत असतात. अखेर या तडजोडीला कंटाळून दोघंही स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतात. हे सर्व होत असतानाच त्यांची 10 वर्षांची मुलगी नित्या एका आजारानं ग्रासली जाते.
म्हणाल तर तसं भयानक वळण पण शेखर-समिराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आयुष्यात आलेली ही कलाटणी. मग या कलाटणीमुळे पुढे काय घडतं हे पाहण्यासाठी तुम्हाला 7 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.