Vijay Chavan : विजय चव्हाण यांची चार दशकांची कारकीर्द!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 09:12 AM2018-08-24T09:12:15+5:302018-08-24T09:13:16+5:30

Vijay Chavan Death :  वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारा हा अष्टपैलू कलाकार रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लिलया वावरला.

vijay chavan life journey so far | Vijay Chavan : विजय चव्हाण यांची चार दशकांची कारकीर्द!!

Vijay Chavan : विजय चव्हाण यांची चार दशकांची कारकीर्द!!

googlenewsNext

मोरूची मावशी या नाटकामुळे लोकप्रीय झालेले ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारा हा अष्टपैलू कलाकार रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लिलया वावरला.



हाजी कासम चाळीत गेले बालपण

विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले.

अशी मिळाली पहिली एकांकिका
कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले.

रंगतरंगची सुरूवात
विजय कदम, विजय चव्हाण आणि अन्य एक मित्र अशा तिघांनी ‘रंगतरंग’ या नाट्यसंस्थेची सुरूवात केली.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुचवले नाव
मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते. यातील विजय चव्हाण यांनी रंगवलेलं स्त्री पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. या नाटकाचे दोन हजारांवर प्रयोग झालेत.

एकाचवेळी १४ भूमिका
‘तू तू मी मी’ या नाटकात विजय चव्हाणांनी १४ भूमिका साकारल्या होत्या. काही सेकंदात वेशभूषा बदलवून ते रंगभूमीवर यायचे आणि प्रेक्षकांना एक सुखद धक्का द्यायचे.

अन् सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हिलचेअरवरून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

Web Title: vijay chavan life journey so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.