Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला बहीण शुभा खोटेला आवरले नाहीत अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 10:18 AM2019-10-01T10:18:08+5:302019-10-01T10:19:17+5:30
Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला शुभा खोटे एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडताना दिसल्या.
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने काल निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी गावदेवीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ३०० हून अधिक मराठी-हिंदी भूमिका त्यांनी साकारल्या. शोले, अंदाज अपना अपना, अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या.
विजू खोटे यांनी अनेक वर्षं मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यांच्या अंत्ययात्रेला अर्शद वारसी वगळता बॉलिवूडमधील कोणत्याच कलाकाराने हजेरी लावली नाही. अभिनेत्री शुभा खोटे या विजू खोटे यांच्या बहीण आहेत. त्या दोघांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. ते दोघे अनेक समारंभाना देखील एकत्र हजेरी लावत. या दोन्ही भावंडांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला शुभा खोटे एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडताना दिसल्या. त्यांचे सांत्वन करणे देखील इतरांना कठीण जात होते. शुभा यांना त्यांची मुलगी भावना बलसावर आणि भावनाचे पती विजू खोटे यांच्या घरी घेऊन आले होते. भावनाने देखील तिचे मामा विजू खोटे यांच्यासोबत जबान संभालके या मालिकेत काम केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या.
सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला.