विक्रम गोखले यांचा राष्ट्रीय पुरस्कारानेही झाला होता गौरव, जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:43 PM2022-11-26T16:43:01+5:302022-11-26T17:01:41+5:30
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर त्यांच्या एका चित्रपटातील ट्रेलर सोशल व्हायरल होतोय. या चित्रपटासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
Vikram Gokhale Death: मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि टीव्हीवरील मालिका अशा अभिनयाच्या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती खालावत गेली व त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर सर्वस्तरांतून आदरांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान त्यांच्या एका चित्रपटातील ट्रेलर सोशल व्हायरल होतोय. या चित्रपटासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
हा चित्रपट आहे २०१३ साली आलेला अनुमती. याचित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्करा त्यावर्षी त्यांना आणि अभिनेता इरफान खानला विभागून दिला होता. यात त्यांच्यासोबत रीमा लागू, नीना कुलकर्णी आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या.
विक्रम गोखले मालिका,नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते 'भूल भुलैया', 'दिल से', 'दे दना दान', 'हिचकी', 'निकम्मा', 'अग्निपथ', 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.
बऱ्याच वर्षांनंतर मालिकेतून केलं होतं कमबॅक
विक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९८९ ते १९९१ या काळात दूरदर्शनवर चाललेल्या 'उडान' या प्रसिद्ध मालिकेतही त्यांनी काम केले होते. याशिवाय त्यांनी अग्निहोत्र, या सुखानों या, संजीवनी आणि सिंहासन या मालिकेत काम केले होते. अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर अनेक वर्षांनंतर ते अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते.