Vikram Gokhale : विक्रम गोखलेंनी वडिलांना नाटक वाचायला दिलं अन् पुढे वेगळंच घडलं....!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:15 PM2022-11-26T16:15:00+5:302022-11-26T16:32:20+5:30
वडिलांच्या सल्ल्याशिवाय विक्रम गोखले कोणतंही नाटक करत नसत. एखादं नाटक चालून आलं तर विक्रम गोखले त्या नाटकाची स्क्रिप्ट आधी वडिलांना वाचायला द्यायचे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आज आपल्यात नाही. आजच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. त्यांच्या वडिलांपासून आजी आजोबांपर्यंत संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीत होतं. विक्रम गोखलेंचे वडील चंद्रकांत गोखले हे तर हाडाचे कलाकार होते. सिनेमा आणि नाटकाचा त्यांना दांडगा अनुभव. म्हणूनच, वडिलांच्या सल्ल्याशिवाय विक्रम गोखले कोणतंही नाटक करत नसत. एखादं नाटक चालून आलं तर विक्रम गोखले त्या नाटकाची स्क्रिप्ट आधी वडिलांना वाचायला द्यायचे.
एकदा विक्रम गोखलेंना एका नाटकासाठी विचारणा झाली. नेहमीप्रमाणे विक्रम गोखले आपल्या वडिलांकडे गेलेत. त्यांना स्क्रिप्ट वाचायला दिली. वाचून मला तुमचं मत सांगा..., असं वडिलांना सांगून विक्रम गोखले निघाले. त्या नाटकाचं नाव होतं, ‘बॅरिस्टर’.
चंद्रकांत गोखले यांनी ‘बॅरिस्टर’ची स्क्रिप्ट वाचायला घेतली. पण त्यानंतर असं काही झालं की, विक्रम गोखलेही अवाक् झालेत. होय, ‘बॅरिस्टर’ची स्क्रिप्ट वाचून चंद्रकांत गोखले इतके भारावले की, मलाही या नाटकात काम करायचंय, असा गोड हट्ट त्यांनी धरला. अगदी मला तात्याची भूमिका करायला आवडेल, असं त्यांनी विक्रम गोखले यांना सांगितलं. स्वत:हून भूमिका मागून घेणं, खरं तर हा चंद्रकांत गोखले यांना स्वभाव नव्हताच. त्यामुळे वडिल स्वत:हून नाटकात काम करण्याची इच्छा प्रकट करताहेत म्हटल्यावर विक्रम गोखले यांनाही क्षणभर विश्वास बसेना.शिवाय वडिलांना काय उत्तर द्यावं, हे त्याक्षणी त्यांना सुचेना. कारण बाबा जुन्या तालमीचे कलाकार, त्यांना नव्या वातावरणात जुळवून घेता येईल का? हा प्रश्न त्यांच्या मनात होता.
बाबा, तुम्हाला खरंच हे जमणार आहे का? असं विक्रम गोखले यांनी वडिलांना विचारलं. यावर, तू विजयाबार्इंना सांग, त्यांना म्हणावं, फक्त माझी एकदा तालीम घ्या, मला फक्त हालचाली सांगा... तालमीत मी पास झालोच तर ठीक नाही तर राहिलं..., असं वडिल म्हणाले.
विक्रम गोखले यांनी ‘बॅरिस्टर’च्या दिग्दर्शिका विजया मेहता यांना ही गोष्ट सांगितलं आणि विजया यांनी लगेच होकार दिला. तालीम झाली आणि चंद्रकांत गोखले त्यात पासही झालेत. मग काय, नाटकातील तात्याची भूमिका विक्रम गोखलेंच्या वडिलांना मिळाली. अशापद्धतीने गोखले पिता-पुत्राची जोडी ‘बॅरिस्टर’ नाटकात एकत्र झळकली.