Vikram Vedha Movie Review : हृतिक रोशन, सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू
By संजय घावरे | Published: September 30, 2022 03:07 PM2022-09-30T15:07:48+5:302022-09-30T15:08:56+5:30
Vikram Vedha Movie Review : जाणून घ्या कसा आहे हृतिक रोशन, सैफ अली खानचा विक्रम वेधा चित्रपट
कलाकार : हृतिक रोशन, सैफ अली खान, राधिका आपटे, शारिब हाशमी, रोहित सराफ, सत्यदीप मिश्रा, योगिता बिहानी, सत्यदीप मिश्रा
दिग्दर्शक : पुष्कर, गायत्री
निर्माते : एस. शशिकांत, चक्रवर्ती रामचंद्र, विवेक अग्रवाल, भूषण कुमार
शैली : अॅक्शन थ्रिलर
कालावधी : दोन तास ४० मिनिटे
स्टार - साडे तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे
बालपणी सर्वांनीच विक्रम-वेताळाच्या कथा ऐकल्या असतील. या चित्रपटात आधुनिक काळातील विक्रम आणि वेताळाची कथा आहे. कुंपणच जेव्हा शेत खातं तेव्हा काय होतं ते या चित्रपटात पहायला मिळतं. २०१७ मध्ये गाजलेल्या तमिळ चित्रपटाच्या या रिमेकची कहाणी हिरो आहे. ती हिंदीत सादर करताना पुष्कर आणि गायत्रीने आवश्यक ते बदल केले आहेत.
कथानक : एन्काऊंटर स्पेशलिस्ट विक्रम (सैफ अली खान) एक एन्काऊंटर करतो. त्यात कुख्यात गँगस्टर वेधाचा (हृतिक रोशन) धाकटा भाऊ (रोहित सराफ) मारला जातो. त्यानंतर अंडरग्राऊंड झालेला वेधा पोलिसांसमोर सरेंडर करतो. चौकशीदरम्यान वेधा विक्रमला एक गोष्ट ऐकवतो. त्या गोष्टीचं उत्तर देताच त्याची वकील म्हणजेच विक्रमची पत्नी प्रिया (राधिका आपटे) त्याचा जामिन देते. वेधा सुटतो, पण विक्रमसमोर काही अनुत्तरीत प्रश्न सोडून जातो. विक्रम पुन्हा वेधाला पकडतो, पण तो पुन्हा एक गोष्ट सांगून पळ काढतो. या गोष्टींच्या माध्यमातून वेधा विक्रमसमोर आपल्या आणि त्याच्या पाप-पुण्याचा हिशेब मांडत असतो. अखेरीस नेमका नायक कोण आणि खलनायक कोण हा प्रश्न पडतो.
लेखन-दिग्दर्शक : पटकथा या चित्रपटाचा प्राण आहे. विक्रम-वेताळाच्या कथेशी सांगड घालत आधुनिक युगातील चोर-पोलिसांचा डाव यात मांडण्यात आला आहे. त्यात काही तत्त्वज्ञानही आहे. बारीकसारीक गोष्टींचं डिटेलिंग अत्यंत बारकाईनं करण्यात आलं आहे. ठराविक अंतरानं ट्विस्ट अँड टर्न्स असल्यानं पुढे काय घडणार याबाबत कुतूहल वाटतं. बोलीभाषेत थोडी गफलत झाल्यासारखी वाटते, पण संवाद चांगले आहेत. हा रिमेक असल्यानं मूळ चित्रपटापेक्षा वेगळा नसला तरी काही अनोखे प्रयोग करण्यात आल्याचं जाणवतं. वातावरण निर्मितीसाठी वापरण्यात आलेले एखादे दुसऱ्या सेकंदांचे बरेच सीन लक्षात राहतात. पावसातील सीन चांगला झाला आहे. दोन मुख्य व्यक्तिरेखांमधली जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील गाणीही चांगली आहेत. 'अल्कोहोलीया...' हे गाणं अगोदरच पॅाप्युलर झालं आहे. अफलातून कॅमेरावर्क आणि फाईट सीन्स बघायला मिळतात. संकलनही सुरेख आहे.
अभिनय : सैफ अली खान आणि हृतिक रोशन या दोघांनीही दमदार अभिनय केला आहे. हृतिकनं साकारलेला वेधा अखेरीस प्रेमात पडावं इतका खरा वाटू लागतो. सैफनं साकारलेला प्रामाणिक आणि कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी स्मरणात राहणारा ठरेल. त्याला राधिका आपटेची चांगली साथ लाभली आहे. वेधाच्या भावाची भूमिका रोहित सराफनं चांगल्या प्रकारे साकारली आहे. चंदाच्या भूमिकेत योगिता बिहानीनं प्रेमाचे अचूक रंग भरले आहेत. शरीब हाश्मीनं वठवलेला बबलूही चांगला झाला आहे. याखेरीज इतर सर्वच कलाकारांनी आपल्या प्रतिभेला शोभेसं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : कथानक, अभिनय, दिग्दर्शन, नृत्य, गीत-संगीत, अॅक्शन सीन्स
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, बोलीभाषेतील फसगत, काही लांबलचक दृश्ये
थोडक्यात : दमदार कथानकावर आधारलेला तितकाच दमदार असलेला हा चित्रपट कलाकारांचा अभिनय आणि नाट्यपूर्ण घडामोडींसाठी एकदा तरी पहायला हवा.