तब्बल दोन वर्षांनंतर विशालची केसांना कात्री! विठूरायाच्या आशिर्वादाने 'राया'चा होणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 01:35 PM2024-07-17T13:35:59+5:302024-07-17T13:42:04+5:30
विशाल निकमची मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये त्याचा लूक बदलणार आहे. विशालचा बदललेला लूक पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत (vishal nikam, yed lagla premacha)
अभिनेता विशाल निकम सध्या स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये काम करतोय. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी रायाचं रांगडी रुप पाहिलं आहे. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने रायाचा कायापालट होणार आहे. नव्या रुपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे. नव्या रुपासह विशााल निकम अर्थात रायाचा हाच प्रेमळ स्वभावही यापुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दोन वर्षांनी विशालची केसांना कात्री
विठुरायाचे आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे. रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या केसांना कात्री लावली आहे. याविषयी सांगताना विशाल म्हणाला, "कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे ते करणं हे कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. रायाचा लूक चेंज ही कथानकाची गरज होती. गेली दोन वर्ष एका सिनेमासाठी मी केस वाढवत होतो. योगायोगाने येड लागलं प्रेमाचं मालिकेसाठी माझी याच लूकमध्ये निवड झाली. दोन वर्षांनंतर मी स्वत:ला अश्या रुपात पहाणार आहे. मी माझा लूक नक्कीच मिस करेन. मला या रुपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार आहे. मला खात्री आहे रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.
विशाल निकमचं विठुरायासोबत खास नातं
ज्याप्रमाणे रायाची विठुरायावर प्रचंड श्रद्धा आहे त्याप्रमाणेच रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचही विठुरायासोबत खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो असं विशाल सांगतो. विशालच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. हरिपाठ, ज्ञानेश्वरी, कीर्तन आणि प्रवचन ऐकत ऐकत मी मोठा झालो. घरच्यांसोबत अनेकदा वारीमध्ये सामील होत विठुरायाचं दर्शन घेतलं आहे. विठुराया माझं लाडकं दैवत आहे असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. येड लागलं प्रेमाचं या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. ही माऊलींचीच कृपा आहे. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो अशी भावना विशालने व्यक्त केली. येड लागलं प्रेमाचं मालिकेतला रायाचा हा नवा अंदाज सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.