'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या

By संजय घावरे | Published: July 5, 2024 06:18 PM2024-07-05T18:18:09+5:302024-07-05T18:18:47+5:30

पर्ण पेठे आणि सुमीतचा नवा सिनेमा 'विषय हार्ड' कसा आहे? वाचा review

vishay hard marathi movie review starring sumit parna pethe | 'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या

'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या

Release Date: July 05,2024Language: मराठी
Cast: पर्ण पेठे, सुमीत, हसन शेख, विपिन बोराटे, प्रताप सोनाळे, नितिन कुलकर्णी, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ, संतोष शिंदे
Producer: गीतांजली पाटील, सर्जेराव पाटीलDirector: सुमित पाटील
Duration: एक तास ५३ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या काळात घडलेली प्रेमकहाणी या चित्रपटात पाहायला मिळते. विविध कॅरेक्टर्स आणि उत्कंठावर्धक कथानकाच्या सहाय्याने सुमीत पाटीलने स्वत:च मुख्य भूमिका साकारत या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. गती संथ असली तरी क्वारंटाईनमधील प्रेमाची हि पॅाझिटीव्ह लव्हस्टोरी खिळवून ठेवते.

कथानक : डॅाली आणि संद्याची ही लव्हस्टोरी आहे. डॅालीशी लग्न करण्यासाठी पैसे कमवायला पुण्यात गेलेला संद्या गावी येतो, पण कोरोनामुळे त्याला विलगीकरण कक्षात राहावं लागतं. तिकडे डॅालीचे आई-वडील तिचं लग्न एका हवालदाराशी लावून देत असतात. डॅालीच्या आत्येचा मुलगाही तिच्याशी लग्न करण्यासाठी आतुर असतो. डॅालीचं मात्र संद्यावर प्रेम असतं. हवालदाराच्या कुटुंबियांना डॅाली पसंत पडल्याने तिचे वडील दोन दिवसांत लग्न लावायला तयार होतात. त्यामुळे डॅालीशी लग्न करण्यासाठी कोरोनाचा रिपोर्ट येण्यापूर्वीच संद्या विलगीकरण कक्षातून पळतो. त्यानंतरची धमाल चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : सुमीतने लिहिलेली मुद्देसूद पटकथा कुठेही ट्रॅकवरून बाजूला जात नसली तरी गती काहीशी संथ वाटते. शीर्षक चित्रपटासाठी मारक ठरणारं असून, कथानकाला न्याय देणारं नाही. कोरोनातील विषय खूप लेट झाला आहे. हा चित्रपट एक-दीड वर्षापूर्वी येणं गरजेचं होतं. बोलीभाषेवरील उत्तम काम, खुमासदार संवाद आणि अपरिचीत कलाकारांचा सुरेख अभिनय ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. क्लायमॅक्सच्या नादात काही ट्रॅक्सकडे दुर्लक्ष झाल्याने ते अर्धवट राहिले आहेत. काही ठिकाणी पुढे काय घडू शकतं याचा अंदाज सहज लावता येतो. रोमँटिक साँग चांगलं झालं आहे. 

अभिनय : आजवर ग्लॅमरस रूपात दिसलेल्या पर्ण पेठेचं नॅान ग्लॅमरस रूप यात आहे. डॅालीच्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देताना ती कुठेही कमी पडलेली नाही. संद्याच्या रूपात सुमीतने साकारलेला नायकही उत्तम झाला आहे. पोलिस पाटीलाच्या भूमिकेत नितीन कुलकर्णी यांनी सुरेख रंग भरले आहेत. डॅालीच्या आई-वडीलांच्या भूमिकेत चैत्राली इनामदार आणि आनंद बल्लाळ यांनी आपलं काम चोख केलं आहे. हसन शेखनं साकारलेला श्रीन्याही लक्षात राहण्याजोगा आहे. विपिन बोराटेने साकारलेला हवालदारही महत्त्वाचा आहे. इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, बोलीभाषा, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : उशीरा आलेला विषय, सिनेमाची गती, संकलन
थोडक्यात काय तर कोरोना गेल्यानंतर फार उशीरा आलेली ही पॅाझिटीव्ह लव्हस्टोरी पुन्हा त्या जुन्या गंमतीजंमतींची आठवण करून देणारी असल्याने एकदा पाहायला हवी.

Web Title: vishay hard marathi movie review starring sumit parna pethe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.