‘हृदयांतर’च्या टीमची लोकमत आॅफिसला भेट

By Admin | Published: June 30, 2017 02:33 AM2017-06-30T02:33:06+5:302017-06-30T02:33:06+5:30

‘हृदयांतर’ या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस

Visiting the heart of the team at the heart of the team | ‘हृदयांतर’च्या टीमची लोकमत आॅफिसला भेट

‘हृदयांतर’च्या टीमची लोकमत आॅफिसला भेट

googlenewsNext

‘हृदयांतर’ या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस या मराठी चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी आपला फॅशन डिझायनर ते दिग्दर्शक असा झालेला प्रवास उलगडला. ते सांगत होते की, सुरुवातीपासूनच एंटरटेनमेंट या क्षेत्रात काहीतरी करण्याची सुप्त इच्छा होती. तसेच फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात असल्याने तांत्रिक गोष्टींविषयी तोंडओळख होती. त्यामुळे मी या क्षेत्रात वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची कथा अफलातून आहे, तसेच कलाकारही कसलेले आहेत. सिनेमातील दोन बालकलाकारांनीही लीलया भूमिकांना न्याय दिला आहे. मला सुरुवातीला दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे व मुक्ता बर्वेसारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करताना दडपण आले होते. पण सर्वांनी मला त्या काळात पूर्ण सहकार्य दिले. त्यामुळे हा सिनेमा यशस्वीरीत्या पूर्णत्वाला जाऊ शकला.
दिग्दर्शकाचे मुळातच सिनेमा या विषयाबद्दल असलेले प्रेम अफाट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. हा संपूर्ण प्रवासच अविस्मरणीय होता, असे सुबोध ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला. मुक्तानेही या सर्वांसोबत काम करताना आलेले अनुभव शेअर केले. ती म्हणाली, दिग्दर्शक किती अनुभवी आहे यापेक्षा तो कसे काम करतो किंवा किती प्रावीण्याने करतो यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते. विक्रम फडणीस हे जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या कामातून दिसत होता आणि प्रेक्षकांनाही चित्रपट पाहताना तो नक्कीच जाणवेल.
‘हृदयांतर’ चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना सुबोध भावे म्हणाला, ‘या चित्रपटात मी कुटुंबाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वडिलांची भूमिका करतो आहे. त्याच्याकडे पत्नी आणि मुलगी यांच्यासाठी बिल्कुल वेळ नाही. स्वत:चे स्वप्न पूर्ण करताना घरातील इतर सदस्यांच्या इच्छा, अपेक्षांना मुरड बसतेय, हे त्याला कळत नाही. सध्याच्या काळातील प्रत्येक बापाचे प्रतिनिधित्व करणारा हा वडील आहे. क्वालिटी वेळ तो कधीच त्याच्या कुटुंबाला देऊ शकत नाही. अनेक कौटुंबिक अडचणी त्याच्या आयुष्यात येतात. त्याला त्याची चूक उमजते. कुटुंब ढासळण्यापूर्वी सावरते, अशा आशयाची चित्रपटाची कथा आहे.’
‘फॅशन क्षेत्राची पार्श्वभूमी असल्याने सिनेमातील पात्रांवर त्याचा प्रभाव झाला का?" असे विक्रम फडणीस यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, चित्रपटातील सर्व पात्रे अतिशय साध्या राहणीमानात दाखविली गेली आहेत. मी जरी फॅशन डिझायनर असलो तरी कपड्यांची निवड करताना त्या पात्राची भूमिका लक्षात घेऊनच मी काम केले आहे. या चित्रपटामध्ये सोनाली खरेसुद्धा दिसणार आहे.
‘मॅरेज कौन्सिलर’च्या भूमिकेतून आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ती देणार आहे. या चित्रपटाचे निर्माते पूर्वेश सरनाईक म्हणाले, ‘या चित्रपटाची कथा व कलाकार या दोन्ही गोष्टी उत्कृष्ट आहेत. त्यामुळे मी फक्त पाठिंबा देत गेलो. या चित्रपटामुळे मला फार आत्मविश्वास मिळाला.’
‘हृतिक रोशन या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटासाठी त्याने खूप मदत केली. त्याचबरोबर त्याने सोशल प्लॅटफॉर्मवर सुबोध आणि मुक्ताचे फार कौतुकही केले. या चित्रपटातील तृष्णिका शिंदे व निष्ठा वैद्य या मुलीही फार लाघवी व समंजस आहेत.’ असे विक्रम फडणीस म्हणाले. यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि टोएब एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’ हा चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Visiting the heart of the team at the heart of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.