विठ्ठलभक्तीची मोहक नाट्यदिंडी...!

By Admin | Published: July 10, 2017 02:44 AM2017-07-10T02:44:52+5:302017-07-10T02:44:52+5:30

आसमंतात अवघा विठ्ठल सामावला असल्याची प्रचिती आषाढीच्या आसपास नित्यनव्याने येत जाते आणि सच्चा वारकरी त्याच्या नकळत या वातावरणात अलगद सामावून जातो.

Vitthalbhakti's fascinating drama ...! | विठ्ठलभक्तीची मोहक नाट्यदिंडी...!

विठ्ठलभक्तीची मोहक नाट्यदिंडी...!

googlenewsNext

-राज चिंचणकर
आसमंतात अवघा विठ्ठल सामावला असल्याची प्रचिती आषाढीच्या आसपास नित्यनव्याने येत जाते आणि सच्चा वारकरी त्याच्या नकळत या वातावरणात अलगद सामावून जातो. मग जळी-स्थळी त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काही दिसत नाही. त्याचे अंतर्मन विठ्ठलभक्तीने काठोकाठ भरून जाते. आयुष्याच्या प्रवासात एकदा तरी पंढरीची वारी व्हावी, अशी अनेक भक्तजनांची फार इच्छा असते; मात्र सर्वांना ते साध्य होतेच असे नाही. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या नाटकाने मात्र भक्तांच्या मनातली ही खंत अचूक ओळखली असून, ही वारी नाट्यदिंडीच्या माध्यमातून मोहकपणे मंचित करण्याचा वसा घेतला आहे.
वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि विठूरायाच्या चरणी समर्पित केलेले अवघे जीवन अतिशय भावपूर्णतेने या नाट्यातून अनुभवायला मिळते. सदाभाऊ, गोजाक्का आणि त्यांची मुलगी मुक्ता ही प्रमुख पात्रे या दिंडीचे मानकरी आहेत. हे तिघे पंढरीच्या वारीला निघाले आहेत आणि या वारीच्या दरम्यान त्यांना येणारी भक्तिप्रद अनुभूती हा या नाट्याचा गाभा आहे. यात माणसाच्या मनाची एक संकल्पना उभी करत त्यालाही एका पात्राचे रूप दिले आहे. पण हे मन नकारात्मक बाजाचे आहे आणि गोजाक्काच्या तनमनावर ते गारुड करते. हे नाट्य केवळ भक्तिमार्गावरच चालत नाही; तर कीर्तन व भारुडाच्या माध्यमातून ते योग्य समाज प्रबोधनही करते.
या नाटकाची मूळ संकल्पना सचिन गजमल यांची आहे. त्यावर लेखक युवराज पाटील व दिग्दर्शक संदीप माने यांनी हे नाट्य रंगमंचावर उभे केले असून, हे नाट्य अधिकाधिक खुलवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्पष्ट दिसतो. भक्तिरसात चिंब करण्याची किमया या लेखनात आहे; तर या वारीचा ठाम पगडा मनावर बसेल याची रुजवात या दिग्दर्शनात आहे. बराच मोठा कलावंतांचा ताफा यात असल्याने, या सर्वांची मोट योग्य पद्धतीने बांधणे ही कसरतच आहे. परंतु हे परिश्रम नक्कीच कामी आले आहेत. मॉबच्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणाऱ्या या नाट्यामुळे ही वारी रंगमंचाचा अवकाश व्यापून उरली आहे. या नाट्यातले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, रंगमंचावर हे वारीनाट्य सुरू असतानाच एका कोपऱ्यात एक शिल्पकार विठ्ठलाची मूर्ती प्रत्यक्ष साकारत असताना दिसतो. नाट्यातल्या या संकल्पनेमुळे वास्तव असा परिणाम साधला जातो. मात्र ही ‘लाइव्ह’ शिल्पकला रंगमंचाच्या अगदीच टोकाला साकार होते; त्यामुळे या आगळ्या प्रकाराकडे तसे दुर्लक्षच होत राहते.
या नाटकात नेपथ्य व प्रकाशयोजना हीसुद्धा महत्त्वाची पात्रे आहेत आणि सुनील देवळेकर यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या ताकदीने पार पाडल्या आहेत. सचिन गजमल यांचे नृत्यदिग्दर्शन नाट्याला साजेसे आहे. नाटकातल्या पात्रांची रंगभूषा आणि वेशभूषा; तसेच संगीतसाथ पूरक आहे. सुरेश चव्हाण (सदाभाऊ), सुलभा जाधव (गोजाक्का), मंगेश कासेकर (मन), सायली काजरोळकर (मुक्ता), मधू शिंदे (विणेकरी), स्नेहा पराडकर (शांताक्का), अर्चना जगताप (रुक्मिणी) आणि सचिन गजमल (विठ्ठल) यांच्या उत्तम अभिनयाचे प्रतिबिंब या वारीत पडलेले आहे. एकूणच, पंढरीच्या वारीला जाता येत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका; कारण जॉय कलामंच आणि सरस्वती थिएटर यांनी या नाटकाद्वारे खरोखरच पंढरीची पाऊलवाट जवळ केली असून, थेट वारीचे पुण्य ओंजळीत घालण्याचे काम केले आहे. परिणामी, या वारीत सामील होण्यावाचून काही पर्यायच उरत नाही.

Web Title: Vitthalbhakti's fascinating drama ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.