"सुशांतसारखाच विचार माझ्याही मनात आला"; विवेक ओबेरॉयने सांगितला आयुष्यातला 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 03:45 PM2024-02-26T15:45:05+5:302024-02-26T15:51:12+5:30
मी जमिनीवर बसून माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून लहान मुलांसारखं ढसाढसा रडायचो.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) नुकताच एक खुलासा केला आहे. सुशांतसिंह राजपूतने जशी आत्महत्या केली तसाच आपलाही विचार होता असं तो म्हणाला. यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. विवेक स्वत: वाईट काळातून गेला आहे. ती आठवण सांगताना तो भावूक झाला. तसंच सुशांतसिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला आलेल्या २० लोकांपैकी विवेक एक होता.
विवेक मुलाखतीत म्हणाला, "मी सुशांतला भेटलो होतो. तो खूप चांगला आणि टॅलेंटेड होता. त्याचं जाणं म्हणजे फिल्मइंडस्ट्रीसाठी मोठं नुकसान होतं. खरं सांगू तर माझ्याही आयुष्यात एक डार्क फेज आला होता. वैयक्तिक ते प्रोफेशनल आयुष्य सगळीकडेच वाईट होत होतं. माझ्याही मनात सुशांतने केलं तसेच विचार आले. सुशांतच्या अंत्यसंस्काराला २० लोकांना यायची परवानगी होती आणि त्यात मी एक होतो. मी त्याच्या वडिलांची परिस्थिती पाहिली. मला सुशांतकडे पाहून हेच वाटलं की मित्रा तू गेल्यामुळे इथे काय झालंय, तुझ्या चाहत्यांची काय हालत आहे हे तुला पाहता यायला हवं होतं. तुला दिसलं असतं तर तू असं पाऊल कधीच उचललं नसतं."
तो पुढे म्हणाला, "आपणच विचार करायला हवा की जेव्हा आपण आत्महत्या करतो त्यानंतर आपल्या जवळच्या माणसांचं काय होतं. प्रेम आणि प्रकाशाकडे जा. नशिबाने माझ्याजवळ घर, कुटुंब होतं ज्यांनी मला सांभाळलं. मी जमिनीवर बसून माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून लहान मुलांसारखं ढसाढसा रडायचो. हे माझ्यासोबतच का असा मला प्रश्न पडायचा. एकदा मी ४० मिनिटं रडत होतो तेव्हा आईने मला विचारलं की जेव्हा तू अवॉर्ड घेत होता, तुला चाहत्यांचं प्रेम मिळत होतं तेव्हा मीच का असा विचार केला होतास का?"
विवेक ओबेरॉयने नुकतंच रोहित शेट्टीच्या 'द पोलिस फोर्स' वेबसीरिजमध्ये भूमिका साकारली. त्याने पुन्हा अभिनयात दमदार कमबॅक केले आहे.