‘स्टारडमपेक्षाही प्रतिसादाची वाट पाहतोय!’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:45 AM2018-07-09T06:45:51+5:302018-07-09T06:47:11+5:30
‘धडक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दोन गुणी कलाकार पुण्यात आले होते. तेव्हा त्यांच्याशी केलेली ही हितगुज..
- जान्हवी सामंत
‘कलाकाराच्या आयुष्यात स्टारडम महत्त्वाचे असले तरीही आमच्यासाठी आता आमच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक महत्त्वाचा आहे. ‘धडक’साठी आम्ही जीव ओतून काम केले आहे; ते प्रेक्षकांना जाणवेलच.’ ‘धडक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दोन गुणी कलाकार पुण्यात आले होते. तेव्हा त्यांच्याशी केलेली ही हितगुज..
इशान-जान्हवी, अवघ्या दहा दिवसांत तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही स्टारडमच्या उंबरठ्यावर उभे आहात. कसं वाटतंय?
- या प्रश्नावर उत्तर देताना जान्हवी म्हणाली,‘मी सध्या तरी स्टारडमचा विचार करत नाहीये. मला अभिनय आवडतो आणि मी माझं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ‘धडक’ची शूटिंग मी खूप एन्जॉय केली. चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत. त्यांना आमचा अभिनय कसा वाटतो, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.’ त्यानंतर इशान उत्तरला,‘मी जान्हवीशी पूर्णपणे सहमत आहे. खरंतर स्टारडम मला वाटते ते नाहीये. मी धडकसाठी माझी संपूर्ण एनर्जी वापरली आहे. जीव ओतून मी यात काम केलं आहे. प्रेक्षकांनाही ते जाणवेलच, यात काही शंका नाही.
‘धडक’ साईन करण्यापूर्वी तुम्ही ‘सैराट’ पाहिला होता का? सैराट तुम्हाला कसा वाटला?
- जान्हवी म्हणाली,‘आम्हा दोघांना घेऊन जेव्हा सैराटचा रिमेक धडक बनवायचा असा विचार सुरू होता तेव्हा आम्ही सैराट पाहिला. चित्रपटाचे कथानक ज्या पद्धतीने मांडले होते, ते खरंच ग्रेट वाटलं. एक प्रामाणिक आणि उत्तम अशी कथा सैराटमध्ये चित्रीत करण्यात आली होती. रिंकु राजगुरूने आर्चीची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे वठवली आहे. मी सैराट बघून प्रभावित झाले होते.’ त्यानंतर इशान म्हणाला,‘सैराट अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला वाटलं की, पर्श्याच्या व्यक्तिरेखेसाठी माझीच निवड व्हावी. या चित्रपटात जो एक खरेपणा आहे तो दुर्मिळ आहे.
भविष्यात कोणत्या प्रकारच्या भूमिका करण्याचा तुमचा मानस आहे?
- जान्हवी म्हणाली,‘मला वाटतं की अजून आम्ही आमच्या आवडीचं काम मागण्याइतपत मोठे कलाकार नाही आहोत. पण, आम्ही जे काम करू ते प्रामाणिकपणे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र, एक कलाकार म्हणून उत्तम भूमिका आमच्याक डे याव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे. अभिनयाने मला बरंच काही शिकवलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात अजून बरंच काही शिकायचं आहे.’ त्याशिवाय इशान म्हणाला,‘मी सध्या मला मिळणाऱ्या भूमिका एन्जॉय करतो आहे. माझा ‘बियॉण्ड द क्लाऊडस’ आणि ‘धडक’ या दोन्ही बिग बजेट चित्रपटांमुळे माझ्या करिअरला गुड स्टार्ट्स मिळाला आहे.’
प्रमोशनच्या हेक्टिक शेड्यूलकडे तुम्ही कसे पाहता? एन्जॉय करताय?
- यावर हसून जान्हवीने म्हटले,‘होय, प्रमोशन करणं म्हणजे थकवा येतो, पण आमच्यासाठी हे सगळं उत्साहवर्धक आहे. भारतभरात या प्रमोशनच्या निमित्ताने अनेकांशी भेटायला मिळालं. ही आमच्या चित्रपटासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे.’ इशान म्हणाला,‘होय, आम्ही चित्रपटासोबतच प्रमोशनही एन्जॉय करतो आहे. गर्दीतल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा उत्साह पाहून आम्हालाही उत्साह येतो.’
२० जुलै रोजी ‘धडक’ रिलीज होणार. मग नंतर काय व्हॅकेशन्सचा
प्लॅन आहे?
- जान्हवी म्हणाली,‘नाही. मला आराम करायची मुळीच इच्छा नाही. मी पुढील प्रोजेक्टवर काम क रू इच्छिते. मी पुन्हा प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात करणार आहे.’ इशानही तिच्या सहमती दर्शवत म्हणाला,‘नाही. मी देखील नव्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत असेल. आमच्यासाठी शूटिंगचीच प्रोसेस जास्त आनंददायी आहे.’