‘कॉमेडी भूमिका करण्यास इच्छुक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:20 AM2017-07-19T02:20:08+5:302017-07-19T02:20:08+5:30

निकी अनेजा वालियाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. एका मालिकेत तिने साकारलेली डॉ. सिमरन ही भूमिका तर प्रचंड गाजली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या

Want to play a comedy? | ‘कॉमेडी भूमिका करण्यास इच्छुक’

‘कॉमेडी भूमिका करण्यास इच्छुक’

googlenewsNext

- Prajakta Chitnis

निकी अनेजा वालियाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. एका मालिकेत तिने साकारलेली डॉ. सिमरन ही भूमिका तर प्रचंड गाजली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती आता एका मालिकेत झळकणार असून तिच्या कमबॅकबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...

तुझी एक मालिका २००६ मध्ये संपली, त्यानंतर इतक्या वर्षांचा ब्रेक का घेतलास?
- मी एका मालिकेत काम करत असताना माझे लग्न झालेले होते. माझे सासर हे लंडनचे आहे. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर मी अनेक वर्षं लंडनमध्येच राहत होते. माझी मुले लहान असल्याने माझा सगळा वेळ मी केवळ त्यांनाच देण्याचे ठरवले होते. छोट्या पडद्यावर परतायचे असे एक-दोन वर्षांपासून माझ्या डोक्यात सुरू होते; पण मला आॅफर करण्यात येणाऱ्या मालिकांच्या कथा मला आवडत नसल्याने मी काम करीत नव्हते.

अभिनयक्षेत्रात काम करीत नसताना तू तुझा वेळ कसा घालवत होतीस?
- लंडनमधील माझे जीवन अतिशय हे सुंदर सुरू होते. मी तिथे एक अभिनेत्री नव्हे तर एक पत्नी, सून, आई या भूमिका साकारत होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही; पण दोन-तीन वर्षांच्या आधी मी अभिनेत्री असल्याचेही माझ्या मुलांना माहीत नव्हते. मी लंडनमध्ये असताना एका इंग्रजी मालिकेत काम केले होते. त्यावेळी माझ्या मुलांना मी अभिनेत्री असल्याचे कळाले. मुले लहान असताना अनेक वेळा लोक मला डॉ. सिमरन अशी हाक मारून माझ्याशी बोलायला येत असत. त्या वेळी मी कोणीही सिमरन नसून सिमरन नावाच्या मुलीशी माझा चेहरा मिळताजुळता असल्याने लोकांना गैरसमज होतो, असे मी त्यांना सांगत असे.

आगामी मालिकेद्वारेच कमबॅक करण्याचे का ठरवले?
- कमबॅक करण्यासाठी मी एका चांगल्या कथेच्या शोधात होते. ज्यावेळी मला या मालिकेची कथा आणि माझ्या व्यक्तिरेखेविषयी सांगण्यात आले, त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता या मालिकेसाठी मी होकार दिला. कारण या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा काहीशी नकारात्मक असून तिला अनेक शेड्स आहेत. मी या मालिकेत काम करण्यास खूपच उत्सुक आहे.

तू काही महिने तरी मुंबईत राहणार आहेस. चित्रीकरणादरम्यान कुटुंबाला कसा वेळ द्यायचा तू ठरवले आहेस?
- मालिकेत काम करण्याचा विचार केल्यानंतर मी माझे सासू-सासरे, माझे पती सोनी आणि मुलांसोबत चर्चा केली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी पुन्हा काम करण्याचा विचार केला. मला जुळी मुले असून ती आता दहा वर्षांची आहेत. माझ्या मुलांना सासू-सासरे आणि माझा नवरा सांभाळत आहेत. मालिकेच्या चित्रीकरणातून काही दिवसांचा ब्रेक मिळाला तर मी लंडनला जाणार आहे आणि मुलांच्या सुटीत ते येथे येणार आहेत, असे आमचे ठरले आहे. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले असल्याने मी मोबाईलद्वारे सतत त्यांच्या संपर्कात असते. त्यांना त्यांच्या अभ्यासाविषयी विचारत असते.

तू एका मालिकेत कॉमिक भूमिकेत झळकली होतीस, प्रेक्षकांना तू पुन्हा विनोदी भूमिकेत कधी पाहायला मिळणार आहेस?
- मला स्वत:ला विनोदी भूमिका साकारायला खूप आवडतात. पण, गेल्या काही वर्षांत मला विनोदी भूमिकांसाठी विचारण्यातच आले नाही. एखादी चांगली विनोदी भूमिका असल्यास मला नक्कीच कॉमेडी करायला आवडेल.

सध्या वेबसीरिजचा जमाना आहे, वेबसीरिजमध्ये काम करण्याचा विचार केला आहेस का?
- मी आता या मालिकेच्या निमित्ताने काही महिने तरी मुंबईत राहणार आहे. त्यामुळे माझ्या या वेळेचा सदुपयोग करण्याचे मी ठरवले आहे. त्यामुळे वेबसीरिज करण्याचे माझ्या डोक्यात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेबसीरिजसाठी तुम्हाला तितकासा वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे मी भविष्यात तुम्हाला एखाद्या वेबसीरीजमध्ये नक्कीच पाहायला मिळेन.

Web Title: Want to play a comedy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.