राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच सांगितले त्यांच्या आजारपणाविषयी, अशी होती त्यांची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 03:35 PM2019-11-09T15:35:09+5:302019-11-09T15:40:19+5:30
कॅन्सर या आजाराला राकेश रोशन यांनी कशाप्रकारे लढा दिला हे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
राकेश रोशन यांना गेल्यावर्षी त्यांना कॅन्सरचे झाले असल्याचे कळाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला होता. पण आता राकेश रोशन यांची तब्येत सुधारत असून त्यांनी या आजारपणाबाबत नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. तसेच त्यांना किमोथेरपी देखील घ्यावी लागली होती. या आजाराला त्यांनी कशाप्रकारे लढा दिला हे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
राकेश रोशन यांनी या मुलाखतीत सांगितले की, या सगळ्याची सुरुवात केवळ एका छोट्याशा फोडीने झाली. माझ्या शरीरावर एक फोड आली होती. ती मला दुखत नव्हती की मला खाज देखील येत नव्हती. ही फोड जाण्यासाठी माझ्या फॅमिली डॉक्टरने काही औषधं दिली होती. पण काही केल्या ही फोड जातच नव्हती. त्याच दरम्यान एका मित्राला रुग्णालयात पाहाण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी मी इएनटी स्पेशालिस्टला भेटलो. मला कॅन्सर झाला असल्याचे मला सतत वाटत होते. त्यामुळेच मी डॉक्टरला दाखवण्याचे ठरवले होते.
डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बायोप्सी करायला सांगितली होती. हा अनुभव खूपच भयानक असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले की, मला सांगण्यात आले होते की माझी जीभ थोडीशी कापली जाऊ शकते. त्याच्यावर नंतर उपचार करून ती बरी होईल. पण या सगळ्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. मला अमेरिकेतील एका स्पेशालिस्टची भेट घेण्यास सांगितले होते. माझ्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी अनेक आजारांना तोंड दिले आहे. हृतिकची ब्रेन सर्जरी झाली होती तर माझी बायको अनेकवेळा आजारी असते. सुनैनाला देखील कॅन्सर होता. या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या असल्याने माझ्या आजारपणात मी कोणत्याही गोष्टीला घाबरलो नाही.
राकेश रोशन यांची तब्येत आता सुधारत असून क्रिश ४ या चित्रपटाद्वारे आता ते चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहेत. त्यांनी सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम करायला सुरुवात केली आहे. क्रिश ४ या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करणार आहेत.