१९ वेबसाईट्ससह १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सवर बंदी
By संजय घावरे | Published: March 14, 2024 07:26 PM2024-03-14T19:26:06+5:302024-03-14T19:26:28+5:30
Government Bans 18 OTT Platforms: अश्लील, असभ्य आणि काही अंशी पोर्नोग्राफिक आशय प्रसारीत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे.
मुंबई - अश्लील, असभ्य आणि काही अंशी पोर्नोग्राफिक आशय प्रसारीत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे. या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित असलेल्या १९ वेबसाईट्स, गुगल प्ले स्टोअरवरील सात आणि अॅप्पल अॅप स्टोअरवरील तीन अॅप्स असे एकूण १० अॅप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात वापरण्यासाठी निष्क्रीय करण्यात आली आहेत.
‘सर्जनशील अभिव्यक्ती’च्या नावाखाली अश्लील, असभ्य आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नसल्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्म्सची असल्याचे वारंवार सांगणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी अश्लील आणि असभ्य आशय प्रसारित करणारे १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्स बंद करत असल्याची घोषणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००मधील तरतुदींअंतर्गत भारत सरकारची इतर मंत्रालये तसेच विभाग आणि प्रसारमाध्यम आणि मनोरंजन, महिलांचे अधिकार आणि बालकांचे अधिकार या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारित होणारे बहुतेक कार्यक्रम अश्लील, असभ्य आणि महिलांचे अशोभनीय चित्रण करणारे असल्याचे आढळले. यात अश्लीलता, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील अनैतिक नातेसंबंध, अनैतिक कौटुंबिक नातेसंबंध यांसारख्या अनुचित संबंधांच्या चित्रीकरणाचा समावेश होता. यावरील आशयांमध्ये संदर्भाहिन प्रदीर्घ लांबीच्या पोर्नोग्राफिक आणि लैंगिकतेवर आधारित दृश्येही होती. आयटी कायद्याचे कलम ६७ व ६७ए, कलम २९२ आणि महिलांचे अशोभनीय प्रदर्शन (प्रतिबंध) कायदा, १९८६ च्या कलम चारचे हे आशय उल्लंघन करत असल्याचे प्रथमदर्शनी निश्चित झाले आहे.
बंदी घातलेले १८ अॅप्स -
ड्रीम्स फिल्म्स, वूवी, येस्मा, अनकट अड्डा, ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निऑन एक्स व्हीआयपी, बेशरम्स, हंटर्स, रॅबिट, एक्स्ट्रामूड, न्यूफ्लिक्स, मूडएक्स, मोजफिक्स, हॉट शॉट्स व्हीआयपी, फुगी, चिकूफ्लिक्स, प्राइम प्ले
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स - अकाऊंट्स संख्या (तक्ता)
फेसबुक - १२
इन्स्टाग्राम - १७
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - १६
युट्यूब - १२
लक्षणीय प्रेक्षकसंख्या
या ओटीटी अॅप्सपैकी एकावर गुगल प्लेस्टोअरवर एक कोटी डाऊनलोड्सची तर इतर दोनवर ५० लाख डाऊनलोड्सची नोंद झाली आहे. त्याव्यतिरिक्त या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी त्यांचे ट्रेलर्स, विशिष्ट दृश्यांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि त्यांच्या वेबसाईट आणि अॅप्सकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक्स्टर्नल लिंक्सचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सची संचित सदस्य संख्या ३२ लाखांवर पोहोचली आहे.