अभिजीत खांडकेकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, झळकणार क्राईम रिपोर्टरच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:05 PM2022-08-05T18:05:35+5:302022-08-05T18:06:13+5:30
Abhijeet Khandkekar: अभिनेता अभिजीत खांडकेकर 'दुरंगा' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिका, चित्रपटानंतर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतो आहे. तो दुरंगा या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ही सीरिज कोरियन सीरिज फ्लॉवर ऑफ इव्हीलची अधिकृत हिंदी रिमेक आहे. रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सची निर्मिती असलेली ही ९ भागांची मालिका म्हणजे रोमँटीक थ्रिलर असून त्यात गुलशन देवैय्याह आणि द्रष्टी धामीसह अभिजीत खांडकेकर, बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भूमिकांत झळकणार आहेत. ही सीरिज १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिजीत खांडकेकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता दुरंगा मालिकेत नामांकित क्राईम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याची व्यक्तिरेखा समित पटेलची खरी बाजू उलगडून लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात दिसेल. तरीच विकासच्या मिशनची माहिती समजताच आपले बराच काळ दडपून ठेवलेले सत्य लपवण्याची खटपट समित करताना पाहायला मिळेल. अभिजीत हा लोकप्रिय मालिका आणि सिनेमे – माझ्या नवऱ्याची बायको, तुझेच मी गीत गात आहे, धर्मवीर आणि तत्सम भूमिकांसाठी ओळखला जातो. दुरंगामधील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
अभिजीत खांडकेकर म्हणाला, “दुरंगासारख्या कार्यक्रमासोबत मी माझा ओटीटी प्रवास सुरू करतो आहे याचा आनंद वाटतो. फ्लॉवर ऑफ इव्हीलसारख्या एखाद्या कोरियन मालिकेचा हिंदी रिमेक पहिल्यांदाच करण्यात आला. फ्लॉवर ऑफ इव्हील प्रचंड यशस्वी ठरल्याने हीच जादू दुरंगा देखील करेल अशी मला आशा वाटते. मला माझ्या ड्रीम टीम सोबत, सहकलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळते आहे. त्यांनी या मालिकेसाठी एक अभिनेता म्हणून प्रोत्साहन दिले आणि खुलवले. त्याशिवाय मी रंगवत असलेले पात्र कथेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि माझ्या कामाबद्दल मी खरंच आनंदी आहे. माझ्या मराठी भूमिकांसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि माझ्या या प्रवासासाठी देखील ते मला साह्य करतील ही आशा आहे”.