Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

By देवेंद्र जाधव | Published: July 16, 2024 12:19 PM2024-07-16T12:19:30+5:302024-07-16T12:20:03+5:30

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना काय अडचणी आल्या. काय शिकायला मिळालं, याविषयी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला (dnyanada ramtirthkar, commander karan saxena)

actress dnyanada ramtirthkar talk about his first hindi webseries commander karan saxena | Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर. 'कमांडर करण सक्सेना' वेबसीरिज निमित्ताने ज्ञानदाने पहिल्यांदा एका हिंदी वेबसीरिजमध्ये काम केलंय. कसा होता तिचा अनुभव? काय आव्हानं आली? अशा सर्व गोष्टींवर ज्ञानदाने लोकमत फिल्मीशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. 

>>> देवेंद्र जाधव

१) पहिल्या हिंदी वेबसीरिज मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
खूप चांगला अनुभव होता. ही वेबसीरिज खूप वेगळ्या धाटणीची आहे. त्यामुळे नवीन आणि वेगळा अनुभव असणारच होता. 'कमांडर करण सक्सेना' वेबसीरिज आणि 'मुंबई लोकल' हा चित्रपट ही दोन्ही कामं 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेनंतर मला ऑफर झाली. या वेबसीरिजमधली भूमिका मालिकेतील अप्पूपेक्षा वेगळी आहे. मी दोन अडीच वर्ष अप्पू साकारल्यानंतर काहीतरी वेगळं करायला मिळतंय ही समाधानाची बाब होती. आमच्या 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेचा बाज कॉमेडी होता. तर या वेबसीरिज निमित्ताने सस्पेन्स, थ्रिलर असं वेगळं काम करायला मिळालं. याशिवाय चांगला अनुभव मिळाला. 


२) वेबसीरिजमध्ये असलेली भूमिका काय? 
मी वेबसीरिजमध्ये कोळी मुलीचं पात्र साकारत आहे. वेबसीरिज मध्ये जी केस solve करत आहेत,त्यासाठी या कोळी मुलीची मदत होते. आम्ही मढमध्ये शूट करत होतो. तिथे सुकी मच्छी वाळत घातलेली असते. त्या ठिकाणी आमचे पाठलाग करण्याचे सीक्वेंन्स आहेत. मी खऱ्या आयुष्यात पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळे मच्छीच्या वासाची मला अजिबात सवय नाही. तो वेगळा वास आणि तो अनुभव मी आयुष्यात कधीच घेतला नाही. त्यामुळे ही एक गंमतच झाली. आजूबाजूला कितीही वास असला तरीही पहिल्या - दुसऱ्या दिवशी मी मनात म्हटलं की, याकडे लक्ष द्यायचं नाही. नंतर मग त्या वासाची सवय झाली. याशिवाय मी जी भूमिका साकारली ती एकदम साधी होती. तसा लूक दिसावा म्हणून मी मेकअप न करता माझं शूट पूर्ण केलं. खऱ्या आयुष्यात आपण जसं दिसतो तसं मला कॅमेरासमोर जायचं होतं. हे मी याआधी केलं नव्हतं. यानिमित्ताने पहिल्यांदाच केलं. हाही एक वेगळा अनुभव. 

३) ॲक्शन सीन करताना अनुभव कसा होता?
मी ॲक्शन सीक्वेन्सचा भाग नाही. हृता दुर्गुळे किंवा 'कमांडर करण सक्सेना'मधील इतर कलाकार तुम्हाला ॲक्शन करताना दिसतील कारण त्यांचे कॅरॅक्टर तसे आहेत. माझ्या वाट्याला कोणता ॲक्शन सिकवेंस आला नव्हता. 


४) मराठी कलाकारांना हिंदी भाषेतील कलाकृतींमध्ये काम करताना न्यूनगंड असतो का? 
न्यूनगंड असा नसतो. पण आपण कुठल्याही दुसऱ्या भाषेत काम केलं तर त्या भाषेवर सुद्धा प्रभुत्व असावं. कारण डायलॉग डिलिव्हरी करताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपण त्या भाषेचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. मी बोलते तेव्हा बोलण्याला एक सूर लागतो. मी सांगली पश्चिम महाराष्ट्राकडची आहे. त्यामुळे नुसतं हिंदी शब्द माहीत असून उपयोग नाही. त्यामुळे हिंदीत बोलताना शब्दश: भाषांतर करून चालत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताचा लहेजा वेगळा आहे. हिंदीत तसं नाही. हिंदीत आपण एका सुरात बोलायला गेलो तर कळेल की हा कलाकार मराठी आहे. जर ती त्या कॅरॅक्टरची गरज असेल तर काही हरकत नाही. या वेबसीरिज मध्ये मी, हृता आणि इतरही कलाकार मराठी बोलतात. कारण त्यांना ते तसंच दाखवायचं होतं. त्यामुळे मध्येमध्ये आम्ही डायलॉग पूर्णपणे मराठीत बोललोय. आमचे दिग्दर्शक जतिन वागळे सुद्धा मराठी आहेत. हिंदीत काम करताना न्यूनगंड असा कधीच नसतो. मी याआधी एक हिंदी सिरीयल केलीय. आता एखाद्या शब्द कसा उच्चारायचा हे मी इतर कलाकारांकडून  शिकायचे. Exact करेक्ट हिंदी काय आहे हे कळत नाही. त्यामुळे आपले जे सहकलाकार असतात त्यांच्याशी संभाषण वारंवार साधता येतो. त्यामुळे हिंदी भाषेच्या उच्चारांची पद्धत कशी आहे ते ऐकून ऐकून जमतं. तो अभ्यास सतत चालू ठेवला की न्यूनगंड असा कधी येत नाही. 

५) वेबसीरिजमध्ये हृता दुर्गुळे, गुरमित चौधरी सारखे सहकलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?
सुदैवाने किंवा दुर्दैवाने एवढा वेळ आम्हाला कधी मिळाला नाही. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत माझ्या दिराचं काम केलेला अभिनेता स्वप्नील काळे या वेबसीरिजमध्ये माझ्या प्रियकराची भूमिका साकारत आहे. सहकलाकार ओळखीचे आहेत त्यामुळे काम करताना comfort होता. बाकी आम्हाला ऑफ कॅमेरा अशी वेगळी मजा करता आलं नाही. तुम्ही सीरिज बघाल जेव्हा कळेल की खूप गडबड असायची. कितीतरी वेळा माझा सीन नसताना काही कलाकारांचं काम मी बघत असायचे. जेणेकरून काही नवं शिकायला मिळेल. 

६) हिंदीमधील असे कोणते अभिनेते - अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत भविष्यात काम करायला आवडेल?

असे खूप कलाकार आहेत. वेगवेगळ्या माणसांसोबत काम करून वेगवेगळे अनुभव घेणं हाच माझा उद्देश आहे. त्यामुळे लिस्ट खूप मोठी होईल. मी नवाझुद्दीन सिद्दीकी यांची मोठी फॅन आहे. पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी यांची कामं मला खूप आवडतात. अभिनेत्रींमध्ये शेफाली शाह मला खूप आवडतात. याशिवाय राधिका आपटे प्रचंड आवडते. अमृता सुभाषही खूप आवडतात.  त्यांची कामं करण्याची पद्धत मला खूप आवडते.

७) आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत?
माझी 'मुंबई लोकल' नावाची फिल्म येतेय. त्यात मनमीत पेम, प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप हे कलाकार आहेत. हा सिनेमा या वर्षीच लवकरात लवकर रिलीज होईल अशी आहे.

Web Title: actress dnyanada ramtirthkar talk about his first hindi webseries commander karan saxena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.