'एप्रिल फूल' बनवणं अंगाशी आलं, अशोकच्या मागे लागली इंटरनॅशनल गँग; OTT वर पाहा 'हा' मजेशीर सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:36 PM2024-04-01T15:36:42+5:302024-04-01T15:39:50+5:30
'एप्रिल फूल' करायला गेला आणि मोठ्या संकटात अडकला; थेट इंटरनॅशनल गँगशी घेतला पंगा; तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा?
आज १ एप्रिल...हा दिवस सर्वत्र एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. जवळच्या व्यक्तीसोबत प्रँक करून त्याला फूल बनवण्याचा आनंद अनेक जण घेताना दिसतात. पण, कधी कधी एप्रिल फूल बनवणं महागात पडू शकतं. असंच खोटा प्रँक करून एप्रिल फूल बनवणं अंगाशी आलं आणि थेट इंटरनॅशनल गँगशी पंगा घेतला. अशी कथा असलेला सिनेमा ६० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा?
बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांबरोबर कॉमेडी जॉनरचे सिनेमेही प्रचंड चालतात. १९६४ साली प्रदर्शित झालेला 'एप्रिल फूल' सिनेमाही प्रचंड गाजला होता. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. एक क्लासिक कॉमेडी चित्रपट म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जातं. 'पेइंग गेस्ट', 'जंगली' यांसारखे सिनेमे बनवणाऱ्या सुबोध मुखर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमाची कथादेखील त्यांनीच लिहिली होती. त्याबरोबरच सिनेमाची निर्मितीही त्यांनी केली होती. या सिनेमात बिस्वजीत आणि सायरा बानो मुख्य भूमिकेत होत्या.
'एप्रिल फूल' सिनेमात बिस्वजीत यांनी अशोक हे पात्र साकारलं होतं. तर सायरा बानो त्याची प्रेमिका मधूच्या भूमिकेत होत्या. हा सिनेमा प्रँक करण्याची सवय असणाऱ्या अशोकच्या आयुष्याभोवती फिरतो. अत्यंत श्रीमंत कुटुंबातील अशोकला लोकांना एप्रिल फूल बनवायला आवडायचं. त्यामुळे एप्रिल फूलची तो दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असे. पण, लोकांबरोबर प्रँक करणं एक दिवस अशोकच्या अंगलट येतं. एप्रिल फूल केल्यामुळे अशोक इंटरनॅशनल गँगच्या निशाण्यावर येतो आणि त्याच्या पाठीमागे ही गँग लागते. या गँगपासून स्वत:चं आणि कुटुंबीयांचं रक्षण करताना अशोकला अनेक संकंटांना सामोरं जावं लागतं. त्याच्याबरोबर त्याची प्रेमिका मधूचेही प्राण धोक्यात येतात. या सगळ्यातून तो कसा मार्ग काढतो, याचा प्रवास मजेशीररित्या ३ तास ३० मिनिटांच्या सिनेमात दाखविण्यात आला आहे.
कुठे पाहाल हा सिनेमा?
एप्रिल फूलवर आधारित असलेला हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध आहे. झी ५ या ओटीटी अॅपवर हा सिनेमा तुम्हाला पाहता येईल. याबरोबरच युट्यूबवरही 'एप्रिल फूल' सिनेमा उपलब्ध आहे.