अतुल कुलकर्णीची हिंदी वेबसीरिज 'बंदीश बँडीट्स 2'चा संगीतमय ट्रेलर रिलीज, सुरेल गाण्यांची मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:33 PM2024-12-02T13:33:03+5:302024-12-02T13:38:25+5:30
२०२० मध्ये गाजलेली वेबसीरिज बंदीश बँडीट्सच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झालाय. अतुल कुलकर्णीची सीरिजमध्ये खास भूमिका आहे
अतुल कुलकर्णी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. अतुल कुलकर्णीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. करिअरच्या सुरुवातीला नाटक, मालिका करणारा अतुल कुलकर्णी आज मराठी-हिंदी मनोरंजन विश्व गाजवत आहेत. अतुल कुलकर्णीच्या एका गाजलेल्या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचं नाव 'बंदीश बँडीट्स 2'. या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांना सुरेल गाण्यांची मेजवानी मिळणार यात शंका नाही.
'बंदीश बँडीट्स 2'चा ट्रेलर रिलीज
२०२० साली आलेली 'बंदीश बँडीट्स' ही वेबसीरिज तिच्या आगळ्यावेगळ्या विषयामुळे चांगलीच गाजली. सीरिजमधील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली. आता याच सीरिजचा दुसरा भाग अर्थात 'बंदीश बँडीट्स 2'चा ट्रेलर रिलीज झालाय. पहिल्या भागात नसीरुद्दीन शाहा अर्थात आजोबांकडून गाणं शिकून त्यांचा नातू संगीतविश्वात त्याचं नाव कमावतो. परंतु काही चुकांमुळे त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून जाते. आता घराणं वाचवण्यासाठी राठोड कुटुंब काय करणार? त्यांना कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागणार? याची कहाणी 'बंदीश बँडीट्स 2'मध्ये दिसणार आहे.
अतुल कुलकर्णींची खास भूमिका
'बंदीश बँडीट्स 2'मध्ये अतुल कुलकर्णीची खास भूमिका आहे. याशिवाय मराठमोळा अभिनेता सुयश टिळकही सीरिजमध्ये भूमिका साकारणार आहे. सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये अतुल यांनी दिग्विजय राठोड ही भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या सीझनमध्ये अतुल पुन्हा एकदा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबत शिबा चढ्ढा, राजेश तेलंग, श्रेया चौधरी, रित्विक भौमिक हे कलाकार पुन्हा एकदा 'बंदीश बँडीट्स 2'मध्ये दिसणार आहेत. नव्या सीझनमध्ये नसीरुद्दीन शाह यांचं निधन झालेलं असल्याने त्यांचा अभिनय पाहता येणार नाही.