'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्री तन्वी मुंडले झळकणार या सीरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:09 IST2024-11-28T18:08:02+5:302024-11-28T18:09:08+5:30
Tanvi Mundle :अभिनेत्री तन्वी मुंडले लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्री तन्वी मुंडले झळकणार या सीरिजमध्ये
झी5ने आपल्या आगामी ओरिजनल हिंदी ड्रामा सिरीज मायेरीचा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. सचिन दरेकर यांच्या झेनिथ पिक्चर्सची निर्मिती असलेला मायेरी हा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा भावनिक थरारपट आहे. त्यामध्ये कुटुंबामधल्या गुंतागुंतीच्या नात्यांचा, तसेच अनेक गुप्त तथ्यांचा आणि व्यक्तीगत रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सीरिजमध्ये भाग्य दिले तू मला मालिकेत झळकलेली अभिनेत्री तन्वी मुंडले (Tanvi Mundle) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मायेरीमध्ये सई देवधर तारा देशपांडे नावाच्या धैर्यशील आईची भूमिका निभावत असून, सागर देशमुख यांनी त्यांच्या नवऱ्याची-हेमंत देशपांडेची भूमिका बजावली आहे, तन्वी मुंडलेने त्यांची साहसी मुलगी मनस्वी हिची भूमिका साकारली असून चिन्मय मांडलेकर आपल्याला कणखर एसीपी खांडेकर म्हणून पडद्यावर दिसतात. प्रेक्षकांना ही सीरिज ६ डिसेंबरपासून झी 5 वर पाहायला मिळेल.
मायेरी सीरिजमध्ये तारा देशपांडे नावाच्या आईच्या कथेभोवती फिरते. सबळ तरुणांच्या समुहाद्वारे निघृणपणे आक्रमण झालेल्या आपल्या मुलीसाठी म्हणजेच मनस्वीसाठी ती कणखरपणे उभी राहते. न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळू न शकल्यामुळे तारा शक्तीशाली गुन्हेगारांविरुध्द मोर्चा बांधण्यासाठी घातक मार्गावरुन मार्गक्रमण करु लागते. सूड घेण्यासाठी ती प्रत्येक स्त्रोत वापरते आणि जमेल तो प्रयत्न करते. कथा जस-जशी पुढे सरकते तसे ताराला आपल्या कुटुंबातल्या अराजकतेचा आणि निर्दयी पोलिस अधिकाऱ्याचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे तिला आपल्या तात्विक मर्यादांना ओलांडावे लागते. प्रत्येक ट्विस्ट सोबत ताण वाढतो, अखेरीस शॉकिंग शेवट पहायला मिळतो. ताराच्या सूडाची तिला सर्वार्थाने किंमत मोजावी लागेल का?
कथा ऐकली, तेव्हा मी प्रचंड भारावून गेले होते
तन्वी मुंडले म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यावेळी मायेरीची कथा ऐकली, तेव्हा मी प्रचंड भारावून गेले होते. ही कथा अतिशय भावनाप्रधान आहे. मनस्वीचा प्रवास व्यक्तीगत प्रगतीचे उदाहरण आहे, जिथे ती क्षती आणि शोधासारख्या गुंतागुंतींच्या भावनांना सांभाळण्याची कला आत्मसात करताना दिसते. सई देवधर, सागर देशमुख यांच्यासारख्या चतुरस्त्र कलाकारांसोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून बरेचकाही शिकण्याची मला संधी मिळाली.