शोटाईम! करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, इम्रान हाश्मीसह झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 15:08 IST2024-01-13T15:06:58+5:302024-01-13T15:08:01+5:30
नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, मौनी रॉय, श्रिया सरन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी

शोटाईम! करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, इम्रान हाश्मीसह झळकणार
मराठीतील अनेक कलाकार हिंदीतही आपल्या अभिनयाचा डंका गाजवत आहेत. प्रिया बापट, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांनी हिंदी वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच एका मराठी अभिनेत्याने पोस्ट करत त्याच्या हिंदी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हॉटस्टारवर येणाऱ्या 'शोटाईम' (Showtime) या वेबसीरिजमध्ये त्याला नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, मौनी रॉय, श्रिया सरन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची ही सीरिज आहे. कोणत्या अभिनेत्याला लागलीए ही लॉटरी?
निर्माता करण जोहर (Karan Johar) 'शोटाईम' ही वेबसीरिज घेऊन येत आहे. करणवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप झाला आहे. आता याच विषयावर तो थेट सीरिजच घेऊन आला आहे. सिनेइंडस्ट्रीतील काळी बाजू आणि आतली रहस्ये 'शोटाईम' सीरिजमधून बाहेर येणार आहेत. लाइट्स, कॅमेरा अँड अॅक्शनवर आधारित जगात प्रत्येकजण पॉवरसाठी आपली मर्यादा कशी ओलांडतो हे दर्शवेल. एकीकडे टीझरमध्ये शोबिझच्या झगमगाट जगाची झलक आहे, तर दुसरीकडे घराणेशाहीचा मुद्दाही आहे. टीझरमध्ये एका ठिकाणी इमरान हाश्मीही म्हणतो आहे की, 'घराणेशाहीच्या मुखवट्याच्या मागे, प्रत्येक बाहेरील व्यक्तीला आंतरिक बनायचे आहे.' काही दिवसांपूर्वीच सीरिजचा टीझर आला. तर आज एका मराठी कलाकाराने आपणही त्या सीरिजचा भाग असल्याचं जाहीर केलं.
मराठी मालिकांमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर 'शोटाईम' सीरिजमध्ये झळकणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर सीरिजचं टीझर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. 'ऑन टू द नेक्स्ट वन..अँड अॅक्शन' असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे. शशांक याआधी हंसल मेहता यांच्या 'स्कॅम 2' सीरिजमध्ये दिसला होता. त्यातही त्याची महत्वाची भूमिका होती. आता त्याला थेट करण जोहरच्या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. शशांकचे चाहतेही हे ऐकून खूपच उत्साहित आहेत.