सिद्धार्थ जाधवची 'सेक्रेड गेम्स'साठी झालेली निवड, अपमान झाल्याने नाकारली सीरिज?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:25 PM2024-04-08T14:25:52+5:302024-04-08T14:26:17+5:30
सेक्रेड गेम्ससाठी मी मुकेश छाब्रिया यांच्याकडे ऑडिशनला गेलो. मी सिलेक्टही झालो होतो. पण...
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची (Siddharth Jadhav) दखल बॉलिवूडनेही घेतली आहे. रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' ते 'सर्कस' अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने भूमिका साकारल्या. सिद्धार्थ अतिशय प्रतिभावान अभिनेता आहे हे त्याने अनेकदा सिद्ध केलंय. तसंच कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठीही तो ओळखला जातो. तर या मराठमोळ्या सिद्धूने 'सेक्रेड गेम्स' ही गाजलेली वेबसीरिज नाकारली होती. अपमान झाल्यानेच त्याने सीरिजला नकार दिला होता.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ जाधव म्हणाला, "सेक्रेड गेम्ससाठी मी मुकेश छाब्रिया यांच्याकडे ऑडिशनला गेलो. मी सिलेक्टही झालो होतो. पण जेव्हा मानधनाबाबतीत बोलणं सुरु होतं तेव्हा त्याने अगदीच कमी पैसे सांगितले. वर मला म्हणाला इतर मराठी कलाकार तर करतात मग तुला काय अडचण आहे. पण तेव्हा मला वाटलं की नाही यार. असं नाही चालणार. मला वाटलं. पैसा म्हणजे सगळं नाही पण तुम्ही आदर द्या. तुमच्या कामामुळे तुम्हाला पुढचं काम मिळतं."
तो पुढे म्हणाला, "ती भूमिका नक्कीच चांगली होती. पण नंतर ती सीरिजमधून काढण्यात आली. कारण ड्युरेशन खूप वाढलं होतं. त्यामुळे एका अर्थी बरंच झालं. मी कधीच पश्चात्ताप करत नाही. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळतंच पण जे नशिबात नाही त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा ते मिळणारच नाही."
'सेक्रेड गेम्स' ही अनुराग कश्यप दिग्दर्शित २०१८ साली आलेली सीरिज आहे.आतापर्यंत सीरिजचे दोन सिझन आले. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांची सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहे. तर राधिका आपटे, अमृता सुभाष, राजश्री देशपांडे या मराठी कलाकारांनीही सीरिजमध्ये काम केलंय.