पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:00 PM2022-05-24T19:00:11+5:302022-05-24T19:07:04+5:30

Raanbaazar: आतापर्यंत या सीरिजचे पहिले ३ भाग प्रदर्शित झाले असून आता लवकरच त्याचे आगामी भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

marathi web series rangbaaz upcoming episode coming soon | पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजने गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी एकत्र स्क्रीन शेअर केली. इतकंच नाही तर पहिल्यांदाच प्राजक्ता माळीचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात प्राजक्ताच्या लूकची वा तिच्या भूमिकेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली. यात अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या या सीरिजच्या पहिल्याच भागाला नेटकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर आता त्याचा दुसरा भागही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवणारी 'रानबाजार' (Raanbaazar) ही पहिली वेब सीरिज ठरली आहे. आतापर्यंत या सीरिजचे पहिले ३ भाग प्रदर्शित झाले असून आता लवकरच त्याचे आगामी भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'रानबाजार'चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच २७ मे रोजी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकणार आहेत. 

“यापूर्वी अशा प्रकारची भूमिका मी कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी 'बबली' इमेज बदलली. रत्ना साकारणे नक्कीच सोप्पे नव्हते. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझे वजन वाढवले. रत्ना ही एक वेश्या आहे. त्यामुळे तिची देहबोली, चालणे- बोलणे, तिचे राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याचा मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवार पेठेत आणि मुंबईतील कामाठीपुरात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांचे निरीक्षण केले. शारीरिक बदलासोबतच मला माझी मानसिकताही बदलावी लागली आणि त्यातूनच ही रत्ना समोर आली. अनेकांनी माझ्या या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. काहींनी नाराजीही व्यक्त केली. परंतु या नाराजीकडे मी सकारात्मकतेने बघतेय. हे 'रत्ना'चे कौतुक आहे,'' असं प्राजक्ता या भूमिकेविषयी म्हणाली.

“आजवर मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. अगदी सरळसाधी मुलगी ते अतिशय बोल्ड मुलगी. बबली इमेज ते अगदी बायोपिक सिनेमेही केले. परंतु अशा प्रकारची बोल्ड व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारत आहे. अनेक प्रतिक्रिया आल्या, येत आहेत. ज्या अपेक्षित होत्या. त्यामुळे त्यांचा मी मनापासून स्वीकार करत आहे आणि हीच माझ्या कामाची पावती आहे. ज्यावेळी या भूमिकेबद्दल मला विचारणा करण्यात आली त्याक्षणी मी ही ऑफर स्वीकारली. अभिजित पानसेसारखे दिग्दर्शक, दमदार कथानक, 'प्लॅनेट मराठी' सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तगडी स्टारकास्ट अशा सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या 'रानबाजर'मध्ये हळूहळू खूप गोष्टी उलगडणार आहेत", असं तेजस्विनी पंडित म्हणाली.

दरम्यान, पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली आहे. यात तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे,  वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

Web Title: marathi web series rangbaaz upcoming episode coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.