"भन्साळी म्हणाले लिपस्टिक पूस", पाकिस्तानी अभिनेत्रीने १५ वर्षांपूर्वी दिलेली 'हीरामंडी'साठी ऑडिशन, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:28 IST2024-12-18T16:28:03+5:302024-12-18T16:28:36+5:30
संजय लीला भन्साळींच्या 'हीरांमडी'साठी पाकिस्तानी अभिनेत्रीनेनेदेखील ऑडिशन दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला.

"भन्साळी म्हणाले लिपस्टिक पूस", पाकिस्तानी अभिनेत्रीने १५ वर्षांपूर्वी दिलेली 'हीरामंडी'साठी ऑडिशन, म्हणाली...
'हीरांमडी' ही यावर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज होती. देवदास, बाजीराव मस्तानी यांसारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या संजय लीला भन्साळींनी 'हीरांमडी'मधून ओटीटीवर पाऊल ठेवलं. त्यांच्या या वेबसीरीजचं आणि त्यातील कलाकारांचंही प्रचंड कौतुक झालं होतं. 'हीरांमडी'मध्ये अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोईराला, संजीदा शेख या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका होत्या. संजय लीला भन्साळींच्या 'हीरांमडी'साठी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननेदेखील ऑडिशन दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला.
१५ वर्षांपूर्वी 'हीरांमडी'साठी ऑडिशन दिल्याचं माहिराने बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. "मी संजय लीला भन्साळींची खूप मोठी चाहती आहे. त्याचं काम मला आवडतं. १५ वर्षांपूर्वी मी माझ्या एका बालपणीच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. तिचं भारतीय मुलासोबत लग्न होतं. आम्ही मुंबईत होतो आणि संजय लीला भन्साळी तेव्हा पाकिस्तानी अभिनेत्रीच्या शोधात होते. माझी मैत्रीण फॅशन डिझायनर रिझवान बेग यांच्याकडून तिच्या लग्नाचे कपडे बनवून घेणार होती. त्यांच्याकडून तिला ही माहिती मिळाली की भन्साळी पाकिस्तानी अभिनेत्रीच्या शोधात आहेत. आणि तिने परस्पर त्यांना माझं नाव सुचवलं", असं माहिराने सांगितलं.
माहिराने भन्साळींच्या भेटीचा अनुभवही सांगितला. ती म्हणाली, "ते किती प्रतिभावान व्यक्ती आहेत. मला बघितल्यानंतर ते मला म्हणाले की लिपस्टिक पुसू शकतेस का? मी त्यांना म्हटलं की मी लिपस्टिक लावलेली नाही. त्यानंतर ते म्हणाले की प्लीज पुसून टाक. नंतर मग मी लिपस्टिक पुसून टाकली. त्यानंतर त्यांच्या तोंडून वॉव असे शब्द बाहेर पडले. मी हिरामंडीचा भाग होणार असल्याने ते खूश होते. पण, ते घडलं नाही. त्यावेळी हिरामंडी हा सिनेमा होणार होता. त्यानंतर काही गोष्टी घडल्या. आणि राजकीय परिस्थितीमुळे मला हा प्रोजेक्ट करता आला नाही".