"काम करुनही पैसे दिले नाहीत"; 'पंचायत'मधील भूषणने 'या' सिनेमांची नावं घेत केली मोठी पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:19 PM2024-07-17T16:19:13+5:302024-07-17T16:19:52+5:30
पंचायतमध्ये बनराकसच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता दुर्गेश कुमारने थेट सिनेमांची नावं घेत मोठा खुलासा केलाय (panchayat 3, durgesh kumar)
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली 'पंचायत ३' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमधील सगळीच पात्रं प्रेक्षकांना आवडली. 'पंचायत ३' मधलं सर्वात भाव खाऊन गेलेलं पात्र म्हणजे भूषण. 'बनराकस' या नावाने फुलेरा गावात लोकप्रिय असलेल्या भूषणची भूमिका अभिनेता दुर्गेश कुमारने साकारली. दुर्गेशने नुकत्याच एका मुलाखतीत त्याला काम करुनही काही सिनेमांचे पैसे त्याला मिळाले नाहीत, असा खुलासा केलाय. इतकंच नव्हे तर त्याने सिनेमांची नावंही सांगितली आहेत.
दुर्गेशने या सिनेमांची नावं घेत केला मोठा खुलासा
एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत दुर्गेशने सांगितलं की, "असं अनेकदा झालंय की कास्टिंग डायरेक्टर आणि निर्मात्यांच्या गोष्टींमुळे मला पैसे नाही मिळाले आहेत. योग्य रक्कम देणारी माणसं खूप कमी आहेत. मला आजपर्यंत बहन होगी तेरी सिनेमाचे १२ हजार रुपये मिळाले नाहीत. याशिवाय द बिग बुलमध्ये अभिषेक बच्चनसोबत माझे काही सीन होते. त्याचे ८ हजार रुपये येणं बाकी आहे. याशिवाय सिस्टर्स नावाची मी एक इंडिपेंडंट फिल्म केली होती. त्याचा ५० हजार रुपयांचा चेक अजून आला नाहीय. याप्रकारचे अनुभव घेणं हा अभिनेत्याचा आयुष्याचा एक हिस्सा आहे."
दुर्गेशचं खऱ्या आयुष्यात लग्न झालंय की नाही?
दुर्गेश कुमारचा स्ट्रगलचा काळ मागे सरुन तो आता मुंबईत सेटल झालाय. त्याचं मुंबईत स्वतःचं घर असून तो एकटाच राहतो. त्याचं कुटुंब दरभंगा गावात राहतं. त्याचं अजून लग्न झालं नाही. त्याचे आई-बाबा त्याच्यासाठी स्थळ शोधत आहेत. अशाप्रकारे दुर्गेशने त्याच्या आयुष्याबद्दल खुलासा केला. दुर्गेशने आजवर विविध सिनेमे आणि सीरिजमध्ये काम केलंय. दुर्गेशला खरी प्रसिद्धी 'पंचायत'मधील भूषणच्या भूमिकेतून मिळाली. 'देख रहा है बिनोद' हा दुर्गेशचा डायलॉग खूपच फेमस झाला. त्यावर तयार झालेले मीम्स व्हायरल झाले.