सान्विका नाही तर हे आहे 'रिंकी'चं खरं नाव, अभिनय क्षेत्रात टिकण्यासाठी मूळ नाव बदललं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 02:22 PM2024-06-02T14:22:20+5:302024-06-02T14:24:08+5:30
'पंचायत 3' मधल्या रिंकीचं खरं नाव वेगळंंच आहे. अनेकजण तिला सान्विका म्हणून ओळखतात. पण तिचं नाव वेगळंच असल्याचा खुलासा तिने केलाय (panchayat 3)
'पंचायत 3' सध्या चांगलंच चर्चेत आहे. वेबसिरीजमधील प्रत्येक कॅरेक्टरवर लोकं भरभरुन प्रेम करत आहेत. वेबसिरीजमध्ये पहिल्या सीझनपासून चर्चेत असलेली एक व्यक्तिरेखा म्हणजे रिंकी. वेबसिरीजमधल्या प्रधानजींची मुलगी रिंकीने सर्वांचं मन जिंकलं. रिंकी आणि सचिवजींची खुलणारी केमिस्ट्री सुद्धा अनेकांना आवडली. रिंकीचं खरं नाव सान्विका आहे, असं अनेकांना वाटत होतं. पण रिंकीचं मूळ नाव सान्विका नसून वेगळंच आहे, याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.
हे आहे सान्विकाने खरं नाव
रिंकी म्हणजेच सान्विका मूळ जबलपूरची आहे. डिजीटल कॉमेंट्री या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सान्विकाने तिच्या खऱ्या नावाचा उलगडा केला. सान्विकाचं मूळ नाव आहे पूजा सिंह. तिने पूजा हे नाव का बदललं याचं कारण तिने स्वतःच सांगितलं. सान्विका म्हणाली, "मला कुणीतरी सांगितलं होतं की, माझं नाव सान्विकाऐवजी 'रिंकी' ठेवावं, पण एक कलाकार म्हणून मी आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. आशा आहे की, रिंकीप्रमाणे भविष्यात लोक मला इतरही नावांनीही ओळखतील."
सान्विकाने मूळ नाव का बदललं?
सान्विका पुढे म्हणाली, "माझं मूळ नाव पूजा आहे. पूजा सिंह नाव मी का लावत नाही कारण, ते खूप कॉमन नाव आहे. इंडस्ट्रीत या नावाचे अनेक लोक आहेत. अशा परिस्थितीत हे नाव प्रेक्षकांना गोंधळात टाकू शकते. ऑडिशनच्या वेळीही याचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मी खूप संशोधन करुन पूजाऐवजी माझं नाव सान्विका असं ठेवलं. पण आजही माझं कागदोपत्री नाव पूजाच आहे." अशाप्रकारे 'पंचायत 3' मधल्या रिंकीच्या मूळ नावाचा खुलासा सर्वांना झाला. 'पंचायत 3' मधील सचिवजी आणि रिंकीची जोडी चांगलीच पॉप्युलर झालीय.