'पंचायत 3' च्या सेटवरुन आली मोठी अपडेट, प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:03 IST2023-12-10T14:02:53+5:302023-12-10T14:03:56+5:30
पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर 'पंचायत' चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'पंचायत 3' च्या सेटवरुन आली मोठी अपडेट, प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली
वेबसिरीजच्या दुनियेतील सर्वात लोकप्रिय सिरीज म्हणजे 'पंचायत' (Panchayat 3). ही सिरीज न पाहिलेले लोक तसे कमीच असतील. उत्तर प्रदेशातील फुलेरा गावात नव्यानेच आलेल्या अभिषेक त्रिपाठी या सचिवची ही कहाणी आहे. गावातील लोकांसोबत अॅडजस्ट होताना त्याला काय काय मजेशीर अनुभव येतात हे सिरीजमधून बघायला मजा येते. सिरीजचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत तर आता चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पंचायत 3' चा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.
पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर 'पंचायत' चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिरीजमधील सर्वच कलाकरांनी अशी काही कमाल केली आहे की प्रत्येकाचीच ही आवडती सिरीज बनली आहे. पंचायत 3 बद्दल महत्वाचं अपडेट समोर आलं आहे जे ऐकून चाहते खूश होणार आहेत. शनिवारी मेकर्सने सीझन 3 चे लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहेत. एका फोटोत सचिवच्या भूमिकेतील अभिनेता जितेंद्र कुमार खांद्यावर बॅग घेऊन आपल्या बाईकवरुन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत बनराकसच्या भूमिकेतील दुर्गेश कुमार, विनोदच्या भूमिकेतील अशोक पाठक आणि प्रल्हादच्या भूमिकेतील फैसल मलिक सोबत दिसत आहेत.
'आम्हाला माहित आहे की खूप वाट बघावी लागत आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी थेट सेटवरुन काही स्पेशल घेऊन आलो आहोत.' असं कॅप्शन फोटोंना देण्यात आलं आहे.
मेकर्सने दिलेल्या या हिंटवरुन 'पंचायत 3' लवकरच रिलीज होणार असल्याचं कळतंय. वेबसिरीजचा पहिला सिझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. तर दोन वर्षांनी 2022 मध्ये दुसरा सिझन आला. प्रेक्षकांनी दोन्ही सीझनला उत्तम प्रतिसाद दिला. आता पुढील वर्षी मार्च महिन्यात अॅमेझॉन प्राईमवर सीझन 3 प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.