'आधी लोकांना माझं नावही माहित नव्हतं...' मिर्झापूर 3 लाँचवेळी पंकज त्रिपाठी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:53 PM2024-03-20T17:53:24+5:302024-03-20T17:55:01+5:30
'गँग्स ऑफ वासेपूर'ने दिली खरी ओळख, 'मिर्झापूर'मुळे कालीन भैय्या म्हणून झाले लोकप्रिय
प्रभावशाली अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या 'मिर्झापूर 3'ची (Mirzapur 3) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणारे पंकज त्रिपाठी आज प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांना अगदी त्यांच्या भूमिकांच्या नावानेही ओळखलं जातं. कालीन भैय्या हे त्यापैकीच एक उत्तम उदाहरण. सुरुवातीच्या काळात पंकज त्रिपाठींच्या वाट्यालाही मोठा संघर्ष आला जेव्हा त्यांना कोणीच ओळखत नव्हतं. छोट्या छोट्या भूमिका साकारत ते वर आले.आता नुकतीच त्यांची एक मुलाखत चर्चेत आहे.
पंकज त्रिपाठी यांनी ओटीटी माध्यमात आपलं वेगळं वर्चस्व बनवलं आहे. काल अमेझॉन प्राईमने एका भव्य इव्हेंटमध्ये एकूण ७० प्रोजेक्ट्सची घोषणा केली. यामध्ये मिर्झापूर 3 चाही समावेश आहे. यासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले, आज लोक मला माझ्या भूमिकांच्या नावावरुन ओळखतात तेव्हा खूप छान वाटतं. सुरुवातीला जवळपास सहा-सात वर्षांपूर्वी मला फार वाईट वाटायचं जेव्हा लोकांनाही माझं नावही माहित नसायचं. तुम्ही अभिनेते आहात त्या सिनेमात सुल्तान ही भूमिका साकारली होती. मला नेहमी असंच वाटायचं की लोकांना माझं माहित असावं आणि आज प्रत्येक जण मला नावाने ओळखतो. त्यांचं माझ्या भूमिकांवर इतकं प्रेम आहे की ते जाणून बुजून मला त्याच नावाने बोलवतात."
पंकज त्रिपाठी यांनी 2004 साली 'रन' सिनेमातून पदार्पण केलं. पण त्यांना स्वत:ची वेगळी ओळख बनवायला वेळ लागला. गँग्स ऑफ वासेपूर सिनेमातून त्यांना खरी ओळख मिळाली. सुल्तान कुरैशी या भूमिकेत त्यांना खूप पसंत केले गेले.
मोठ्या प्रतिक्षेनंतर आता 'मिर्झापूर 3'चा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. पोस्टरमध्ये एक सिंहासन आहे ज्याला आग लागली आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सिंहासनावर दावा करताना गुड्डू आणि गोलू एका नवीन दावेदारविरोधात उभे आहेत. आता त्यांना आगीतून जावं लागणार की सत्ते संघर्षाची ही खुर्ची कायमची नष्ट करणार.