Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
By ऋचा वझे | Published: September 28, 2024 02:37 PM2024-09-28T14:37:58+5:302024-09-30T11:19:26+5:30
आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदीतही आपली छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट 'रात जवां है' या नव्या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या निमित्ताने प्रियाने 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधताना सेटवर केलेली धमाल-मजा-मस्ती सांगितली. तसेच अनेक इतर विषयांवरही गप्पा मारल्या.
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) 'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर आणखी एका हिंदी सीरिजमध्ये दिसणार आहे. सुमित व्यास दिग्दर्शित 'रात जवां है' (Raat Jawan Hai) या आगामी सीरिजमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. तसंच बरुण सोबती आणि अंजली आनंद हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. नव्यानेच पालकत्व अनुभवणाऱ्या तीन मित्रांची ही कहाणी आहे. ११ ऑक्टोबरला सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजचा एकंदर अनुभव कसा होता याविषयी प्रियाने लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली
'रात जवां है' सीरिजमधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
मी सुमन या भूमिकेत आहे. ही तीन मित्रांची गोष्ट आहे जे लहानपणापासून सोबत आहेत. तसंच आता तिघंही आपापल्या आयुष्यात पालकत्वाचा अनुभव घेत आहेत. पण मुलांचा सांभाळ करता करता त्यांना स्वत:ला वेळच देता येत नाही. पुन्हा मित्र म्हणून एकमेकांना भेटायचं, मजा करायची यासाठी ते प्रयत्न करत असतात. यात त्यांची मैत्री कशी टिकते, त्यांचं पुढे काय होतं याची ही गंमतीशीर गोष्ट आहे."
सेटवरचा अनुभव कसा होता? काय वेगळेपण होतं?
"आमच्या सेटवर दोन गोष्टी खूप छान होत्या. सेटवर लहान मुलं असतानाचं व्यवस्थापन खूप वेगळं होतं. kids friendly जागा तयार करण्यात आली होती. त्यांची वेगळी सोय होती. तसंच असा सेट मी कुठेही इतरत्र बघितला नाही. संपूर्ण ग्रीन सेट होता. प्लास्टिकचा वापर नाही, सगळ्यांना काचेच्या बाटल्या दिल्या होत्या. ओला कचरा सुका कचरा वेगळा, त्याचं विघटन सुद्धा वेगळीकडे केलं जातं."
सीरिजमध्ये तू एका मुलाची आईही आहे. लहान मुलांसोबत शूट करणं किती आव्हानात्मक असतं?
लहान मुलांच्या सेटवरही शिस्त होती. लहान मुलं असताना बाकी गरजेची लोकंच सेटवर असायची. कोणीही आरडाओरडा करायचा नाही. फक्त दिग्दर्शक, कलाकार, ती मुलं आणि त्यांचे आई वडील एवढेच. त्या छोट्या मुलांना अजिबातच कोणी घाबरुन सोडलं नाही. माझा मुलगा दीड वर्षांचा होता. बरुणचा अगदीच ८ महिन्यांचा होता. तर अंजलीची मुलगी ३ वर्षांची होती. माझा मुलगा नुकताच चालायला शिकला होता. त्यामुळे त्याची पळापळ असायची. त्यांच्यासाठी थांबणं, त्यांच्या कलाने शॉट घेणं, शॉट झाल्यानंतर बाकीच्या सीनसाठी त्यांना जाऊ द्यायचे. मग ते व्हॅनिटीत खेळत बसायचे, त्यांचा शॉट आला तर परत बोलवायचे. शॉटच्या बाबतीत आपले पेशन्स लागतात. पण कधीकधी ती मुलंही असे मॅजिकल शॉट द्यायचे की आम्ही बघत राहायचो."
बरुण आणि अंजली यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?
खूपच अप्रतिम होता. ती दोघंही खूप छान माणसं आहेत. सध्या नवी मैत्री होणं तेही कलाकारांमध्ये हे जरा कठीणच असतं. कारण कोण काय विचार करतंय हे आपल्याला माहित नसतं. पण बरुण आणि अंजली यांच्यासोबत माझी खऱ्या आयुष्यातही तशीच मैत्री झाली. त्यांचं काम मी आधी बघितलं नव्हतं, मी त्यांना ओळखतंही नव्हते पण स्वभावाने दोघंही खूप चांगले असल्याने आम्ही लगेच मित्र झालो.
तुझे आणखी कोणते हिंदी प्रोजेक्ट्स येणार आहेत?
जानेवारी महिन्यात माझी 'अंधेरा' नावाची सीरिज येणार आहे. हा हॉरर शो असणार आहे. तसंच कदाचित याच महिन्यात 'जिंदगीनामा' ही अँथॉलॉजी येणार आहे. मानसिक स्वास्थ्याबाबतीतील जागृकतेवर ही सीरिज आधारित आहे. तसंच आणखी काही प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट्स यायचे आहेत.