"माझी तीच क्लीप व्हायरल झाली...", प्रिया बापटला आलं रडू; आई-वडिलांना लावला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:05 IST2025-01-17T10:03:31+5:302025-01-17T10:05:02+5:30
'त्या सीनबद्दल सांगण्यासाठी प्रियाने वडिलांना लावला फोन अन्,...'

"माझी तीच क्लीप व्हायरल झाली...", प्रिया बापटला आलं रडू; आई-वडिलांना लावला फोन
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) मालिका, नाटक, सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर आता ती वेब सीरीजमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची 'रात जवाँ है' सीरिज आली. ही हलकीफुलकी सीरिज प्रेक्षकांना खूपच आवडली. तर याआधी प्रियाने 'सिटी ऑफ ड्रीम्स' मध्ये पूर्णिमा गायकवाड ही अतिशय ताकदीची व्यक्तिरेखा साकारली. याच्या पहिल्या सीझनवेळीच प्रिया बापटची सीरिजमधील एक क्पिल तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर प्रियाला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. नक्की काय घडलं होतं हे तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
'सिटी ऑफ ड्रीम्स' मध्ये प्रियाची भूमिका पॉवरफुल राजकारणीची आहे. पण यासोबतच प्रिया एक लेस्बियनही दाखवली आहे. सीरिजच्या पहिल्याच सीझनमध्ये तिचा दुसऱ्या मुलीसोबत इंटिमेट होतानाचा सीन आहे. 'डिजीटल कॉमेंट्री'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, "मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. मला आठवतं त्या दिवशी मी आणि एजाज मुलाखती देत आहोत. अचानक फोन वाजायला लागला. सगळे म्हणत होते की नको ओपन करु. मला त्याकडे व्हायरल क्लिप म्हणून बघायचं नव्हतं. कारण मला माहित होतं की मी शोमध्ये काय केलं आहे. रिलीजचा तो पहिलाच दिवस होता आणि तो व्हिडिओ बाहेर आला. आम्हाला प्रश्नच पडला की हे बाहेर कसं आलं. कारण आमच्या टीमने तर हे केलं नव्हतं. ही काही आमची प्रमोशनल स्ट्रॅटेजी नव्हती."
ती पुढे म्हणाली, "मला कळतच नव्हतं की लोक याबद्दल इतकं का बोलत आहेत. मी ऑनस्क्री पहिल्यांदाच इंटिमेट सीन दिला होता. मी खूप डिस्टर्ब झाले, रडले. आधी आईबाबांना फोन केला. त्यांना सांगितलं की असा असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. २-३ दिवस तरी मी रडतच होते. पण मी तो सीन केला कारण ती कथेची गरजच होती. लोक पूर्ण सीरिज का बघत नाहीयेत आणि छोट्या गोष्टींवरुन ट्रोल करत आहेत. पण मला वडिलांनी खूप सपोर्ट केला. हे तुझ्या कामाचा भाग आहे तू केलंस, आता विसर."
"जेव्हा एखादा पुरुष इंटिमेट सीन करतो तेव्हा त्याचे क्लिप तर व्हायरल करत नाही. मग नेहमी महिलांनाच का लक्ष्य करता? तुम्ही माझ्या कामावर बोला, अगदी इंटिमेट सीनमध्ये मी तो सीन नीट नाही दिला असं सांगितलं तरी चालेल. मी त्यावर काम करेन. पण ते कॅरेक्टर आहे. तुम्ही मला वैयक्तिकरित्या का बोलत आहात असाच मला प्रश्न पडतो."