Review: रोमँटिक ‘होम टाउन चा चा चा’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:51 AM2023-01-16T11:51:48+5:302023-01-16T11:52:29+5:30
होम टाउन चा चा चा’ ड्रामा सिरीज रोमान्सवर आधारित उत्तम उदाहरण
रंजू मिश्रा
अनेक कोरियन ड्रामा सिरीज रोमान्सवर आधारित आहेत. परंतु, ‘होम टाउन चा चा चा’ या सिरीजला याचे एक उत्तम उदाहरण समजू शकतो, ज्यात रोमान्ससोबतच मुख्य भूमिकांचा संघर्षही तेवढ्याच बारकाईने आणि गांभीर्याने दाखवण्यात आला आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेली ही सिरीज हिंदीत डब्ड केली आहे. २००४ चा दक्षिण कोरियाई चित्रपट ‘मिस्टर हँडी, मिस्टर होंग’चा रिमेक आहे. या सिरीजचे आणखी एक विशेष म्हणजे ही एक व्यावसायिक स्तरावर हिट असण्यासोबतच कोरियन टीव्हीच्या इतिहासातील सर्वांत जास्त रेटिंग असणारी सिरीज आहे. आठ आठवड्यांपासून रिलीज झालेल्या सिरीजपैकी ही टॉपवर असलेली सिरीज आहे. चला तर मग बघूयात ही सिरीज का एवढी खास आहे ते...
कथानक:
दक्षिण कोरियाची राजधानी असलेली सोलची एक स्मार्ट आणि सुंदर दंत चिकित्सक यून हे-जिन (शिन मिन-ए) ही नोकरी गमावल्यानंतर समुद्रकिनारी असलेल्या गोंगजिन गावात फिरायला जाते. ती तिथे गेल्यावर नवे हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार करते. तिथे तिची भेट चीफ होंग नावाच्या प्रसिद्ध होंग डू-सिक (किम सुन-हो) यांच्यासोबत होते. डू-सिक हा सुंदर आणि बुद्धिमान तरुण आहे. तो बेरोजगार परंतु सर्वांना मदत करणारा असतो. नेहमी सर्वांची मदत करणारा डू-सिक हा हे-जिनची मदत करतो. यादरम्यान त्या दोघांमध्ये जवळीकता वाढते. परंतु, हे-जिन त्याच्यापासून दूर राहण्याचा विचार करते. तेव्हाच तिचा कॉलेजमेट जी सेओंग-ह्यून (ली संग-यी) हा देखील टीव्ही शोच्या शूटिंगसाठी गोंगजिन येथे येतो. तो हे-जिनच्या वडिलांना प्रभावित करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. दुसरीकडे डू-सिकदेखील तिचा प्रियकर असण्याचा दिखावा करतो. या प्रेमाच्या त्रिकोणात जेव्हा डू-सिक हा हे-जिनचा जीव वाचवतो, तेव्हा ती त्याच्यावर प्रेम करू लागते. परंतु, नंतर डू-सिकचा रहस्यमय भूतकाळ समोर येतो. तो भूतकाळ काय आहे? या भूतकाळाचा त्या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होतो? त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचते की नाही हे जाणून घेण्यासाठी सिरीजच बघावी लागेल.
कोरियन ड्रामा सिरीज
- शीर्षक - होम टाउन चा चा चा
- स्टार्स- ****
- कलाकार - शिन मिन-ए, किम सियोन-हो, ली संग-यी, गांग मिन जेउंग, कांग ह्युंग-सियोक, किम जी-ह्यून
- दिग्दर्शक- यू जे-वोन लेखक- शिन हा-यून
- शैली- रोमँटिक कॉमेडी भाग- १६