औषधांच्या जगातील काळी गुपितं येणार समोर, रितेश देशमुखची पहिली वेबसीरिज 'पिल'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:06 PM2024-06-27T17:06:42+5:302024-06-27T17:07:02+5:30
पिल या वेबसीरिजमधून रितेश ओटीटी माध्यमात पदार्पण करतोय. या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय (pill, riteish deshmukh)
रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'पिल' या वेबसीरिजची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. या वेबसीरिजच्या माध्यमातून रितेश ओटीटी माध्यमात पदार्पण करायला सज्ज आहे. या सीरिजबद्दल उत्सुकता जागवणारे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या सीरिजबद्दल आणखी उत्सुकता चाळवणारा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आपल्या रोजच्या आरोग्यदायी जगण्याशी संबंधित फार्मास्युटिकल म्हणजेच औषध उद्योगक्षेत्राचे जग नेमके कसे आहे, याची एक झलक या ट्रेलरमधून पहायला मिळते.
'पिल'मधून औषधउद्योगातील काळी गुपितं येणार समोर
'पिल'मध्ये रितेश देशमुख प्रकाश चौहान या भूमिकेत दिसतो. भारतातील फार्मास्युटिकल जगताविषयी अनेक रहस्य दडली आहेत. या रहस्यांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न प्रकाश चौहान करताना दिसणार आहे. बलाढ्या फार्मा उद्योजक, भ्रष्टाचारी डॉक्टर्स ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, स्वत:चा फायदा पाहणारे औषध नियामक, राजकारणी, पत्रकार आणि या सगळ्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य माणसांच्या माध्यमातून ही कथा पुढे सरकताना दिसते. पवन मल्होत्रा यांनी फार्मा कंपनीच्या सीईओची भूमिका साकारली आहे. फार्मा कंपनीचे असेच सीईओ रुग्णांऐवजी फायद्याला देताना दिसतात. योग्य आणि अयोग्याच्या या लढाईत सत्य शोधून काढण्यासाठी प्रकाश यशस्वी होईल का? याची छोटीशी झलक ट्रेलरमध्ये बघायला मिळते.
पिल कधी आणि कुठे रिलीज होणार?
'पिल' वेबसीरिजचा ट्रेलर रोमांचक आणि थराराक आहे. सीरिमध्ये रितेश देशमुख, पवन मल्होत्रा, अक्षत चौहान, अंशुल चौहान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. १२ जुलैला जिओ सिनेमा प्रिमियमवर ही वेबसीरिज तुम्हाला पाहायला मिळेल.
ओटीटी पदार्पण करण्याबाबत रितेश देशमुख म्हणाला, “डिजिटल स्ट्रीमिंगच्या जगात पदार्पण करताना मला आनंद वाटतोय. आपलं दैनंदिन आयुष्य आणि एकूणच आरोग्यावर प्रचंड परिणाम करणारी एखादी गोळी ही खरंतर सामान्य बाब आहे. पण, त्यातील ही प्रचंड गुंतागूंत समजून घेणे फार औत्सुक्याचे होते. हा प्रवास बरंच काही शिकवणारा होता. या सीरिजमध्ये आपले सर्वस्व ओतणाऱ्या राज कुमार गुप्ता आणि रॉनी स्क्रूवाला यांच्यासारख्या द्रष्ट्यांसोबत काम करणे हा खरेतर माझाच सन्मान आहे. फार्मा कंपन्यांमधील भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई प्रेक्षकांनाही आपलीशी वाटेल, असा मला विश्वास आहे.” अशा भावना रितेशने व्यक्त केल्या आहेत.