'वारंवार अपमानित झालेले..'; सुव्रतने साकारलेली ट्रान्सजेंडरची भूमिका पाहून भारावली सखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:11 IST2023-08-17T16:10:40+5:302023-08-17T16:11:24+5:30
Sakhi gokhale: 'ताली' या वेबसीरिजमध्ये सुव्रतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

'वारंवार अपमानित झालेले..'; सुव्रतने साकारलेली ट्रान्सजेंडरची भूमिका पाहून भारावली सखी
तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन हिने गौरी सावंतची भूमिका साकारली आहे. तर, या सीरिजमध्ये काही मराठमोळे कलाकारही झळकले आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी. तालीमध्ये सुव्रतने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक होत असतानाच त्याची पत्नी अभिनेत्री सखी गोखले हिने तिचं मत मांडलं आहे. सखीने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'ताली' या वेबसीरिजमध्ये सुव्रतने मुन्ना ही एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्याच्या अभिनयाचं सध्या सगळेच जण कौतुक करत आहेत. परंतु, सखीची पोस्ट सध्या जास्त चर्चेत येत आहे.
काय आहे सखीची पोस्ट?
"मला तुझा खूप अभिमान वाटतो. काय सुंदर परफॉर्मन्स दिला आहेस तू. तुझ्यासोबत राहून सुद्धा तू या भूमिकेसाठी कधी तयारी केली हे मला पडलेलं कोडं आहे. तुझ्या अभिनयातून तू दाखवलेली संवेदनशीलता, आजवर दुर्लक्षित राहिलेल्या वारंवार अपमानित झालेले जेंडर हे सगळं साकारण्यासाठी लागणारा समतोल राखण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस हे दिसून येतयं. तू कायम स्वत:ला अशी आव्हान देत राहा, तुझ्या भवतीची बंधन तोडत रहा, " असं सखी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "स्वत:च्या कलेत अजून नैपुण्य मिळवण्यासाठी आणि स्वत:च्या कलेशी एकनिष्ठ राहण्याची तू मला आज जी प्रेरणा दिली आहेस".
दरम्यान, सखीने या पोस्टमध्ये क्षितिज पटवर्धन, रवी जाधव, सुश्मिता सेन यांचंही कौतुक केलं आहे. या सीरिजमध्ये हेमांगी कवि आणि ऐश्वर्या नारकर या मराठी अभिनेत्री झळकल्या आहेत. या सीरिजचे एकूण ६ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड साधारणपणे ३० मिनिटांचा आहे. त्यामुळे संपूर्ण सीरिजचा विचार केला तर ही सीरिज ३ तासांची आहे.