Scam 2003 नंतर शशांकची आणखी एका हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी; गश्मीर महाजनीही झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 09:49 IST2024-05-16T09:44:26+5:302024-05-16T09:49:32+5:30
क्या बात! शशांक केतकर आणि गश्मीर महाजनी झळकणार एकाच हिंदी वेब सीरिजमध्ये

Scam 2003 नंतर शशांकची आणखी एका हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी; गश्मीर महाजनीही झळकणार
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेत त्याने साकारलेल्या श्री या पात्राला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही शशांक दिसला. टेलिव्हिजन आणि मोठ्या पडद्यानंतर 'स्कॅम २००३' या वेब सीरिजमधून त्याने ओटीटीवर पदार्पण केलं. या हिंदी वेब सीरिजमध्ये शशांकला पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. आता शशांकची आणखी एका वेब सीरिजमध्ये वर्णी लागली आहे.
'स्कॅम २००३'नंतर हॉटस्टारचा मोठा प्रोजेक्ट शशांकच्या हाती लागला आहे. हॉटस्टारच्या वेब सीरिजमध्ये शशांक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये शशांकबरोबर मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीदेखील स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शशांकने सहकलाकारांबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शशांक आणि गश्मीरबरोबर दर्शन पांड्या आणि सुरभी ज्योतीदेखील दिसत आहेत. या फोटोला त्याने "गुन्हा करना भी एक स्किल है, नये काम की ये नयी टीम है" असं कॅप्शन दिलं आहे.
शशांकने त्याच्या या नव्या वेब सीरिजच्या नावाचा अद्याप उलगडा केलेला नाही. पण, त्याला आणि गश्मीरला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांकने या वेब सीरिजसाठी त्याचा लूकही चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे.
स्कॅम २००३ नंतर शशांक करण जोहरचं प्रोडक्शन असलेल्या 'शो टाइम' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. आता पुन्हा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शशांक सध्या 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. पाहिले न मी तुला या मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. 'हे मन बावरे' मालिकेतही शशांक मुख्य भूमिकेत होता.