"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा
By ऋचा वझे | Updated: January 31, 2025 12:27 IST2025-01-31T12:26:06+5:302025-01-31T12:27:32+5:30
सुबोध भावेंचा कोणता सिनेमा पाहून भारावली श्रेया? 'लोकमत फिल्मी'शी साधला संवाद

"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा
ओटीटी माध्यमात सर्वात चर्चेत असणाऱ्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे 'बंदिश बँडिट्स'. संगीतावर आधारित या सीरिजचा वेगळा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी सीरिजचा दुसरा सीझन आला. हाही रसिक-प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला. वेबसीरिजमध्ये घराणा संगीत, नवोदित संगीतकार यांच्यातील जुगलबंदी लक्ष वेधून घेणारी आहे. तसंच राधे आणि तमन्ना यांची लव्हस्टोरीही आहे. तमन्ना शर्मा हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्रेया चौधरीने (Shreya Choudhry) नुकतंच 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. यावेळी तिने कोणता मराठी सिनेमा आवडतो याचाही खुलासा केला.
श्रेया चौधरी ही मुंबईतच लहानाची मोठी झाली आहे. तिची आई मराठी कुटुंबातील आहे त्यामुळे श्रेयालाही छान मराठी बोलता येतं. ती तिच्या आजीसोबत बसून मराठी सिनेमे आवर्जुन बघायची. यावेळी तिने सुबोध भावेच्या एका मराठी सिनेमाचं नाव घेतलं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "सुबोध सरांचा डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा मला खूप आवडतो. माझी आजी मला तो सिनेमा बघायला घेऊन गेली होती. आजीसोबत बसून मी खूप मराठी कंटेंट पाहिला आहे. मला तो सिनेमा खूपच आवडला. सुबोध सरांचं काम पाहून मी भारावून गेले. सिनेमातही काशिनाथ घाणेकर या एका कलाकाराचीच गोष्ट होती त्यामुळे मी लगेच सिनेमाशी कनेक्ट झाले.याच सिनेमानंतर मला अभिनेत्री होण्याची प्रेरणा मिळाली. तो सिनेमा पाहून मला एक कलाकार म्हणून खूप शिकायलं मिळालं."
बंदिश बँडिट्स सीरिजमध्ये अभिनेते अतुल कुलकर्णीही मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना श्रेया म्हणाली, "अतुल सर तर अद्भूत कलाकार आहेत. मी नेहमीच त्यांचं काम बघत आले आहे. त्यांचं काम बघून प्रभावित झाले आहे. ते असे कलाकार आहेत ज्यांना पाहून आपल्यालाही आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. या सीरिजमुळे मला त्यांना सेटवर काम करताना पाहता आलं. बरंच काही शिकता आलं. ते भूमिकेसाठी कशी तयारी करतात हेही बघता आलं. इतकी वर्ष काम केल्यानंतर आता मला सगळं येतं असा त्यांचा अॅटिट्यूड दिसत नाही. ते खूप डेडिकेटेड आहेत. ती ऊर्जा काहीतरी वेगळीच असते. मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला नक्की आवडेल."