"गौरी सावंत यांची मुलाखत घेतलेली तेव्हा...", सुश्मिता सेनची 'ताली' सीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:57 AM2023-08-16T10:57:50+5:302023-08-16T11:00:05+5:30
Taali Web Series : सुश्मिता सेनची 'ताली' पाहून सुबोध भावेही भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला...
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेली 'ताली' ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. आपल्या हक्कासाठी लढा देणाऱ्या तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेब सीरिज आहे. या सीरिजमधून त्यांचा संघर्ष मांडण्यात आला आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेदेखील ताली वेब सीरिज पाहून भारावून गेला आहे. 'ताली' पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
सुश्मिता सेनच्या 'ताली' वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सीरिजमध्ये कृतिका देव, सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'ताली' वेब सीरिजचं पोस्टर शेअर करत त्यातील कलाकारांचंही कौतुक केलं आहे. "श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत 'ताली' ही अप्रतिम वेब मालिका पाहिली. 'बस बाई बस' या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. क्षितीज मित्रा त्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही.खूप खूप कौतुक तुझे...", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे त्याने "हेमांगी कवी, सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत. अप्रतिम रवी जाधव देवा, तुझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये तुझा खास असा ठसा असतो.या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलाय, प्रेम...कृतिका देव...गणेश-गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. सुश्मिता सेन तुम्ही त्या झाला होता.बस इतकेच...गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन...", असंही म्हटलं आहे.
'ताली' वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर क्षितीज पटवर्धनने या सीरिजचं संवादलेखन केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री कृतिका देवने या सीरिजमध्ये गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. तर सुव्रत जोशी एका तृतीयपंथीयांच्या भूमिकेत आहे.