रोहित शेट्टीच्या Indian Police Forceमध्ये झळकणार सुचित्रा बांदेकर, ट्रेलरमध्ये दिसली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:48 IST2024-01-08T15:48:18+5:302024-01-08T15:48:36+5:30
सिद्धार्थ, शिल्पा आणि विवेकच्या वेब सीरिजमध्ये सुचित्रा बांदेकर! रोहित शेट्टीच्या Indian Police Forceमध्ये अभिनेत्रीची वर्णी

रोहित शेट्टीच्या Indian Police Forceमध्ये झळकणार सुचित्रा बांदेकर, ट्रेलरमध्ये दिसली झलक
सुचित्रा बांदेकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता सुचित्रा हिंदी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमध्ये सुचित्रा यांची वर्णी लागली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सुचित्रा यांची झलक पाहायला मिळाली आहे.
'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, इशा तलवार, श्वेता तिवारी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. दिल्लीत बॉम्बस्फोट करुन पळ काढलेल्या आरोपींचा शोध पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असलेले सिद्धार्थ, शिल्पा आणि विवेक घेणार आहेत. तीन मिनिटांचा या सीरिजचा ट्रेलर म्हणजेच परिपूर्ण अॅक्शनपॅक्ड आहे. रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या या सीरिजमध्ये सुचित्रा बांदेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
सुचित्रा यांनी त्यांच्या या नवीन प्रोजेक्टबाबत एक पोस्ट केली आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' वेब सीरिजचा ट्रेलर सुचित्रा यांनी शेअर केला आहे. "नक्की पाहा...आशीर्वाद द्या", असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत सुचित्रा यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
रोहित शेट्टीची 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेब सीरिज १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅमेझॉन प्राइमवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सीरिजमधून शिल्पा शेट्टी ओटीटीवर पदार्पण करत आहे. तर सुचित्रा यांच्याबरोबर या सीरिजमध्ये शरद केळकर, वैदेही परशुरामी हे कलाकारही दिसणार आहेत.