'राजी-नामा'त रंगणार 'खुर्ची'साठीचं राजकीय युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:57 AM2022-07-02T09:57:00+5:302022-07-02T09:57:48+5:30
Raji-Nama Web Series : प्रियम गांधी मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारीत 'राजी-नामा' वेबसीरिज आहे.
सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारीत 'राजी-नामा' ही दमदार वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत 'राजी-नामा'(Raji-Nama)चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले असून वेबविश्व हादरून सोडणाऱ्या 'रानबाजार'(RaanBaazar)नंतर अभिजित पानसे (Abhijeet Panse) आणि 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) ही जोडी पुन्हा एकदा 'राजीनामा'च्या निमित्ताने एकत्र येणार आहे.
प्रियम गांधी मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारीत 'राजी-नामा'ची संकल्पना आणि या सीरिजचे लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. आता लवकरच प्रेक्षकांना पुन्हा एकदा सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे जणू एक समीकरणच आहे. त्यांच्या चित्रपटाचे विषय नेहमीच हटके असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या 'रानबाजार'ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.
यशोशिखरावर पोहोचलेल्या 'रानबाजार'मधील सत्तानाट्यानंतर आता 'राजी-नामा'मध्येही 'खुर्ची'साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. या सीरिजमध्ये कोण कोण कलाकार दिसणार, हे अद्याप समजू शकलेले नाही.