'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:04 PM2024-05-02T15:04:15+5:302024-05-02T15:05:53+5:30
फरिदा जलाल यांना सोडून इतरांनी.... नक्की काय म्हणाला शीजान खान?
संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडियावर सीरिजचं कौतुक होत आहे. अनेक प्रेक्षकांनी सीरिजला पसंती दर्शवली आहे. दरम्यान टीव्ही अभिनेता शीजान खानने मात्र सीरिज पाहून संजय लीला भन्साळींवर टीका केली आहे. 'उर्दू भाषेसोबत इतका अन्याय का?' असा प्रश्न त्याने विचारला आहे. नक्की काय म्हणाला शीजान खान?
1 मे रोजी 'हीरामंडी' सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली. गेल्या काही दिवसांपासूनच सीरिजची खूप चर्चा होती. सहा अभिनेत्रींनी यामध्ये एकत्र काम केलं आहे. पाकिस्तानात लाहोर येथे हीरामंडी हा वेश्या व्यवसाय करणार्या महिलांचा एरिया आहे. याच बाजारावर सीरिजची कहाणी आधारित आहे. त्यामुळे सीरिजमध्ये बऱ्यापैकी उर्दू भाषेचा वापर करण्यात आलाय. मात्र सीरिज पाहिल्यानंतर टीव्ही अभिनेता शीजान खान भडकला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "संजय लीला भन्साळींच्या हीरामंडीमध्ये फरीदा जलाल यांना सोडून इतर कोणीच उर्दू नीट बोलू शकलेले नाही. किसी का नुक्ता, खा, काफ हे शब्द नीट उच्चारले गेले नाहीयेत. का भाई का? उर्दूसोबत इतका अन्याय का? अत्यंत निराशा."
शीजान खान हा तोच अभिनेता आहे ज्याला टीव्ही अभिनेत्री आणि त्याची सहकलाकार तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. तुनिशाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शीजान काही महिने तुरुंगात होता. नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
हीरामंडी' हा प्रोजेक्ट करायचा याचा संजय लीला भन्साळी १८ वर्षांपासून विचार करत होते. मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, रिचा चड्डा, शर्मिन सहगल, शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन यांची सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहे.