'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 09:36 AM2024-11-11T09:36:44+5:302024-11-11T09:37:13+5:30
'सिटाडेल हनी बनी' चं शूट सुरु असतानाच समंथाला मायोसायटिस आजाराचे निदान झाले होते.
वरुण धवन (Varun Dhawan) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांची 'सिटाडेल हनी बनी' ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यातील वरुण आणि समंथाच्या अॅक्शन सीन्सची आणि केमिस्ट्रीची चर्चा आहे. सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मायोसायटिस आजाराचा सामना करत असतानाच समंथाने या सीरिजचं शूट केलं होतं. शूट दरम्यान समंथा बेशुद्धही पडली होती असा खुलासा वरुणने नुकताच एका मुलाखतीत केला.
'सिटाडेल हनी बनी' चं शूट सुरु असतानाच समंथाला मायोसायटिस आजाराचे निदान झाले होते. तेव्हा समंथा हा शो सोडणारही होती. मात्र तिने असे केले नाही. याचे कारण सांगताना ती म्हणाली, "मी खूप जिद्दी आहे. जेव्हा मला वाटतं की सगळं संपत चाललं आहे तेव्हा माझं मन वळवणं अवघड आहे. मी सुरुवातीपासूनच माझे निर्णय स्वत:च घेतले आहेत. चुकांमधून शिकले आहे. मला कोणीही गॉडफादर नव्हता ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकेन. नेहमी मीच स्वत:साठी उभी राहिली आहे. टीमनेही मला खूप सपोर्ट केला आणि जे अशक्य होतं ते शक्य करुन दाखवलं. जर हे लोक नसते तर मला यातून बरं होण्यासाठी वेळ लागला असता."
यानंतर वरुण धवन म्हणाला, "दोन उदाहरणं आहेत. जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटत होतं. कारण मला आठवतंय शूट करताना समंथाने डोळे बंद केसे आणि ती म्हणाली,'हा त्या दिवसांमधला एक दिवस आहे'. आम्ही जवळपास दोन तास शूट करत होतो आणि थोड्यावेळाने एक ऑक्सिजन टँक आला आणि ती बाजूला बसून ऑक्सिजन घेत होती. ती खरंतर सुट्टीही घेऊ शकली असती."
तो पुढे म्हणाला,"दुसऱ्या वेळी आम्ही सर्बियात शूट करत होतो. समंथाला माझ्या मागे धावायचं होतं असा सीन होता. मी कॅमेऱ्यामागून पळालो आणि ती अजूनही फ्रेममध्ये होती. तोच ती पडली. मी तिला पकडलं आणि राजजवळ गेलो. ते म्हणाले, 'पॅक अप'. ते मला म्हणाले,'शांत राहा, तू तिकडे जाऊन उभा राहा. ती ठीक होईल.'