सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:13 IST2025-01-21T10:12:45+5:302025-01-21T10:13:10+5:30
'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा खास ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालाय (secret of shiledars)

सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर
गेल्या वर्षी अर्थात २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजची घोषणा झाली. या वेबसीरिजमधचा अनोखा विषय आणि छत्रपती शिवरायांच्या काळाशी जोडलेला संबंध यामुळे सर्वांना 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स'ची उत्सुकता आहे. काहीच दिवसांमध्ये ही वेबसीरिज रिलीज होत असताना 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स'चा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमुळे 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स'विषयीची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे.
'सिक्रेट ऑफ शिलेदार्स'चा ट्रेलर
सई ताम्हणकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा ट्रेलरमध्ये दिसतं की, शिवरायांच्या काळातील लपवलेला मौल्यवान खजिना धोक्यात असतो. हा खजिना वाचवण्याची जबाबदारी राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर घेतात. दिलीप प्रभावळकर त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवतात. पुढे काय होतं? हे वेबसीरिज रिलीज झाल्यावरच कळेल. 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचं दिग्दर्शन 'मुंज्या' फेम आदित्य सरपोतदार यांनी केलंय.
कधी आणि कुठे बघाल ही सीरिज?
या सिरीजमध्ये राजीव खंडेलवालसह सई ताम्हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज ३१ जानेवारी २०२५ पासून फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर पाहता येईल. डॉ.प्रकाश कोयडे यांच्या 'प्रतिपश्चंद्र' या पुस्तकावर ही वेबसीरिज आधारीत आहे. शिवरायांच्या काळातील १७ व्या शतकातील लपवलेल्या रहस्याचा २१ व्या शतकात शोध लागणार, अशी या वेबसीरिजची टॅगलाइन आहे.