Mi Punha Yeil: अखेर राज्याचे मुख्यमंत्री ठरले!; 'मी पुन्हा येईन'चे महाएपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 06:17 PM2022-08-12T18:17:01+5:302022-08-12T18:18:00+5:30
Mi Punha Yein: प्रेक्षकांची ही उत्सुकता फार काळ न ताणता 'मी पुन्हा येईन'चे अखरेचे दोन भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्लॅनेट मराठी निर्मित मी पुन्हा येईन (Mi Punha Yein) ही सीरिज सातत्याने चर्चेत राहिली. राजकारणावर आधारित असलेल्या या सीरिजला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या सीरिजच्या प्रत्येक भागामधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली जात होती. त्यामुळे अखेर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे आतूर झाले होते. त्यामुळेच प्रेक्षकांची ही उत्सुकता फार काळ न ताणता 'मी पुन्हा येईन'चे अखरेचे दोन भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
'मी पुन्हा येईन'च्या अखेरच्या दोन भागांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या दोन भागांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान दिवटेंकडे जाणार की मुरकूटे यांच्याकडे जाणार याचा उलगडा होणार होता. अखेर हे दोन भाग आज (१२ ऑगस्ट) प्रदर्शित झाले आहेत.
प्रदर्शित झालेल्या या दोन भागांमध्ये प्रेक्षकांना पडलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. पळून गेलेले ४ अपक्ष आमदार रिसॉर्टवर परत कसे येतात, अपक्ष आमदारांनी सत्तेचा पाठिंबा काढल्यावर तपास यंत्रणेचा बेमालूमपणे वापर कसा होतो, पोलिसांवरील दबावतंत्र, राजकारणी नेहमी कसे सर्वश्रेष्ठ असतात? हे सांगण्याचा आमदारांचा प्रयत्न, राजकारण्यांच्या सोयीप्रमाणे अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या महाएपिसोडमध्ये देण्यात आली आहेत. मात्र, मुख्यमंत्री पदाचं खुर्चीत कोण विराजमान झालं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना या सीरिजचे अखेरचे दोन भाग पाहावे लागतील.
दरम्यान, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’मध्ये सयाजी शिंदे (sayaji shinde), उपेंद्र लिमये (upendra limaye), सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav), रुचिता जाधव (ruchita jadhav), भारत गणेशपुरे (bharat ganeshpure) ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकली आहेत.